जोतिबा पालखी सोहळ्याची परंपरा यंदा थांबली... पण 'तो' डोंगरावर पोहोचलाच 

jyotiba yatra ceremony canceled 2020 corona virus
jyotiba yatra ceremony canceled 2020 corona virus

जोतिबा डोंगर -  श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेत निघणाऱ्या भव्य पालखी सोहळ्याची परंपरा आज कोरोनाच्या कारणामुळे थांबली. जोतिबाचे सर्व ग्रामस्थ पुजारी हे पंधरा लोकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा काढावा यासाठी आग्रही होते पण आज दुपारी पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, अधिक्षक महादेव दिंडे, जोतिबा गावचे १० गावकरी, उपसरपंच शिवाजीराव सांगळे यांची पालखी संदर्भात चर्चा झाली पण प्रशासनाने पालखी टेंपोत घालून यमाई मंदिराकडे घेऊन जाऊन धार्मिक विधी करण्यासाठी सुचवले. त्यामुळे ग्रामस्थ आज नाराज झाले.

प्रशासनाच्या आदेशानुसार हा पालखी सोहळा रद्द झाला. सांयकाळी सहा वाजता ज्योतिबाच्या मुख्य मंदिरात धार्मिक विधी होऊन पालखी टेम्पोत व उत्सव मूर्ती इनोव्हा गाडीतून ठाकरे मिटके गल्ली मार्गे यमाई मंदिराकडे रवाना झाली. त्या ठिकाणी सांयकाळी पारंपरिक पद्धतीने सर्व धार्मिक विधी होऊन आतिषबाजी झाली. १२१ वर्षानंतर आज डोंगरावर यात्रेतील पालखी सोहळा खंडित झाला. त्यामुळे यंदा ज्योतिबाचा डोंगर गुलालात  न्हावून जायचा राहिला.

जोतिबा यात्रेसाठी दरवर्षी महाराष्ट्र कर्नाटक आंध्रप्रदेश गुजरात या राज्यातील नऊ ते दहा लाख भाविक खास पालखी सोहळ्यावर  गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यासाठी येतात पण कोरोनाच्या भितीमुळे प्रशासनाने चैत्राची यात्रा रद्द केली. भाविकांना डोंगरावर येण्यास बंदी घातली आणि पालखी सोहळा ही अखेर रद्द केला. 

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आज राज्यभरातील लाखो भाविकांनी घर बसल्या श्री जोतिबा देवाकडे साकडे घातले.

एक भाविक दर्शनासाठी आलाच..

जोतिबा डोंगरावर कालपासून सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असतानासुद्धा आज चैत्र यात्रेनिमित्त ज्योतिबा देवाचे दर्शन घेण्यासाठी एक ६० वर्षाचा वयोवृद्ध भाविक गायमुख तलाव मार्गे दर्शनासाठी आला व त्याने देवाचे दर्शन घेतले. ही बाब स्थानिक पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी त्या वयोवृद्ध भाविकास  झोडपले पण त्या ही भाविकाने मी आज चैत्र यात्रेच्या दिवशी माझ्या ज्योतिबा देवाचे दर्शन घेतले आहे. आता माझा जीव गेला तरी चालेल असे म्हणत त्याने पोलिसांना हात जोडले व आलेल्या वाटेने तो वयोवृद्ध निघून गेला.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com