पोस्ट खाते आले आंबाप्रेमींच्या मदतीला धावून ; पोस्टाने घरपोच मिळणार आंबा...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

कर्नाटक सरकारची योजना : पोस्टाद्वारे ऑर्डरनुसार वितरण करणार

बेळगाव - लॉकडाऊनमुळे यंदाच्या हंगामात आंबाप्रेमींना अद्याप आंब्याची चव चाखता आलेली नाही. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. बाजारपेठ बंद असल्याने आंब्याची आवकही कमी आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत आंबा खायला मिळेल की नाही अशी भिती अनेकांना आहे. मात्र, पोस्ट खाते आंबाप्रेमींच्या मदतीला धावून आले आहे. कर्नाटक सरकार इंडिया पोस्टच्या सहकार्याने आंबा घरपोच उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे, पोस्टमनच आंब्याची पेटी घेऊन घरी येणार आहेत.

लॉकडाऊनचा काळ वाढल्याने बाजारपेठेवरही विपरीत परिणाम झाला आहे. विक्रेत्यांनी बागायतदारांकडून आंब्याची उचलच केलेली नाही. त्यामुळे द्राक्षांप्रमाणेच आंबा पिकांचेही नुकसान होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, पोस्ट खात्याच्या सहकार्याने ती समस्या मार्गी लावण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर सध्या रामनगर, चिक्कबळ्ळापूर आणि कोलार जिल्ह्यात आंब्याची उचल सुरु झाली आहे. यासाठी शासनाने संकेतस्थळ उपलब्ध करून दिले असून त्यावर आपली ऑर्डर दिल्यास पोस्टमन आंब्याची पेटी घरपोच करणार आहे. सुमारे 9 मेट्रीक टन आंबा अशा पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे. आंबा घरपोच करताना योग्य ती काळजी घेतली जाणार आहे.

वाचा - आता बेळगावात या ठिकाणी होणार कोरोनाची तपासणी... 

अशी द्या ऑर्डर

शासनाच्या "karsirimangoes.kanataka.gov.in' या संकेतस्थळावर आंब्याची ऑर्डर ग्राहकांना नोंद करावी लागणार आहे. यानंतर आंब्याची पेटी 'हायजिनिकली पॅक' करुन पोस्ट पार्सलद्वारे घरोघरी पाठविली जाणार आहे. ही सेवा घरपोच देताना पोस्टमनला मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. कर्नाटक आंबा विकास आणि विक्री महामंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे. आंब्याची ऑर्डर दिल्यानंतर आंबा पॅक केलेला बॉक्‍स ग्राहकाच्या जवळच्या पोस्ट ऑफिसात दाखल झाल्यानंतर त्याठिकाणी तो निर्जंतूक करून नंतरच ग्राहकांपर्यंत पोचणार आहे.

डझनाला तीन किलो

बदामी आंब्याला सध्या 179 रुपये प्रति किलोचा भाव निश्‍चित करण्यात आला. एका डझनात तीन किलो आंबे बसतात. त्यामुळे, पार्सल तीन किलोचे असेल. या दरानुसार पोस्ट खाते डिलिव्हरी खर्च म्हणून 81 रुपये शुल्क आकारणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Karnataka government will provide the mango house in collaboration with India Post