केएमटी आज धावणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनच्या काळात दोन महिने बंद असलेली केएमटीची बससेवा सोमवार (ता. 1)पासून पूर्ववत सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात केवळ 10 बस सोडण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने यात वाढ होणार आहे.

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनच्या काळात दोन महिने बंद असलेली केएमटीची बससेवा सोमवार (ता. 1)पासून पूर्ववत सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात केवळ 10 बस सोडण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने यात वाढ होणार आहे.

सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत ही सेवा सुरू राहणार असल्याची माहिती परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांनी दिली आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यानंतर 4 मेपासून अनेक व्यवहार पूर्ववत सुरू झाले; पण बससेवा नसल्याने अनेकांना पायपीट करावी लागली. या पार्श्‍वभूमीवर उद्यापासून ही सेवा सुरू होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

लॉकडाउनमध्ये केएमटीची बससेवा 24 मार्चपासून बंद केली होती. ही बससेवा सुरू करण्यासाठी प्रवासी, कोल्हापूर शहर नागरी कृती समिती व विविध सामाजिक संघटना यांनी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने 1 जूनपासून केएमटी बस सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे.

ही बससेवा अंशत: प्रथम आठ मार्गांवर सुरू करण्यात येत आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित मार्गांवर बस सोडण्याचे नियोजन आहे. सर्व प्रवासी नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून केएमटी उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे व अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाषचंद्र देसाई यांनी केले आहे. 

या मार्गांवर धावणार बस 

* शाहू मैदान ते मार्केट यार्ड 
* शाहू मैदान ते विवेकानंद कॉलेजमार्गे शुगर मिल 
* गंगावेस ते एस.टी. स्टॅंड 
* छत्रपती शिवाजी चौक ते कळंबा 
* शिवाजी चौक ते क्रांतिसिंह नाना पाटीलनगर 
* शिवाजी चौक ते बोंद्रेनगर 
* शिवाजी चौक ते जरगनगरमार्गे आर.के.नगर गणपती मंदिर 
* शिवाजी चौक ते राजारामपुरीमार्गे आर.के.नगर 
.... 

लहान मुले, ज्येष्ठांना प्रवेश बंद 
बसमधून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व 10 वर्षांखालील लहान मुलांना तात्पुरता प्रवेश बंद केला आहे. सर्व चालक, वाहकांना ड्यूटीवर असताना हॅंडग्लोज व मास्क बंधनकारक केले आहे. तिकीट देण्यापूर्वी वाहकाकडून प्रत्येक प्रवाशाला सॅनिटायझर देण्यात येईल. बस वेळापत्रकाप्रमाणे धावणार नसून उपलब्ध मार्गांवर किमान प्रवासी उपलब्ध झाल्यास नियंत्रण केंद्रावरून बस सोडण्यात येईल. प्रत्येक फेरीनंतर निर्जंतुकीकरण करण्यात येईल. प्रत्येक बसमधून किमान 20 ते 22 प्रवाशांना प्रवास करता येईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KMT will run today