esakal | Video : सुर्याच्या भोवती का पडतात खळे जाणून घ्या..
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur  Although the appearance of rainbow around the sun is a miraculous phenomenon it is a natural process

लोकांमध्ये कुतूहल : पाऊस भरपूर पडणार की, परतीच्या प्रवासाला लागणार? 

Video : सुर्याच्या भोवती का पडतात खळे जाणून घ्या..

sakal_logo
By
अमोल सावंत

कोल्हापूर : निळेभोर आकाश अन्‌ पिंजारलेल्या ढगांच्या तुकड्यांमध्ये आज एक नवल घडले. सुर्याच्या भोवती इंद्रधनुष्याचे खळे तयार झाले. साडेबारा ते दिड वाजण्याच्या सुमारास हे इंद्रधनुष्याचे खळे तयार झाले. नंतर ते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हळूहळू लुप्त झाले. सुर्याभोवती इंद्रधनुष्याचे खळे दिसणे ही चमत्कारीक घटना असली तरी ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. असे म्हणतात की, इंद्रधनुष्य तयार झाले की, पाऊस लांबतो किंवा पाऊस भरपूर पडतो. सामान्य लोकांमध्ये मात्र ते कुतूहल असते. 

इंद्रधनुष्य म्हणजे, पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणांवर आणि दवबिंदूंवर पडलेल्या सुर्यप्रकाशाचे परावर्तन/अपवर्तन होऊन प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय, प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. या वर्णपटात बाहेरील कडेस तांबडा आणि आतील कडेस जांभळा रंग दिसतो. जेव्हा इंद्रधनुष्य आपण पटकन पाहतो तेव्हा त्यावर पांढऱ्या रंगांचा प्रभाव असतो. क्वचित प्रसंगी मुख्य इंद्रधनुष्याबाहेर पसरलेले, फिक्‍या रंगांतील आणि मुख्य इंद्रधनुष्याच्या वर्णपटाच्या उलट्या क्रमाने रंग दाखवणारे (जांभळा बाहेरील कडेस आणि तांबडा आतील कडेस असणारे) दुय्यम इंद्रधनुष्य ही दिसते. 

हेही वाचा- कळतय पण वळत नाही : बेडसाठी दिवसभर; इंजेक्‍शनसाठी रात्रभर अन् मास्क मात्र हनुवटीवरच

संपूर्ण गोलाकार इंद्रधनुष्याला "इंद्रवज्र' असे म्हणतात. इंद्रवज्र क्वचित आणि फक्त काही भौगोलिक ठिकाणीच दिसते. प्रत्येक इंद्रधनुष्य हा पूर्ण गोल "इंद्रवज्रच' असतो; मात्र क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो. पावसाचे थेंब कसे, कुठल्या दिशेने जातील, त्यातले अंतर आणि किती वेगात पडत आहेत यावर इंद्रधनुष्याचे पूर्ण गोलाकार दिसणे अवलंबून असते. इंद्रवज्राचे वैशिष्ट्य असे, की जो हे दृश्‍य पाहतो; तो स्वतःलाच त्यात पाहतो. पाहणा-याचे डोके बरोबर मध्यभागी दिसते. 

यावर्षी जून अन्‌ सप्टेंबरमध्ये असे इंद्रधनुष्य दिसले. जूनमध्ये तयार झालेले इंद्रधनुष्य हे क्षितीजावर होते; तर आजचे दिसलेले इंद्रधनुष्य सुर्याच्या भोवती खळ्याप्रमाणे दिसले. गतवर्षी दोन ते तीन वेळेला सुर्याभोवती असेच इंद्रधनुष्य दिसले होते. योगायोग असा की, मागील वर्षी (2019) कोल्हापूर जिल्ह्यात तर प्रचंड महापूर आला. जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झाला होता. यावर्षी मात्र सप्टेंबरमध्ये सुर्याभोवती इंद्रधनुष्य दिसल्याने पाऊस प्रचंड पडेल की, पाऊस पडणार नाही, याची चर्चा शहरवासियांमध्ये सुरु होती.

हेही वाचा- माजी खासदार धनंजय महाडिकांसाठी आजही तो नंबर ठरतोय हिट

अजूनही नियमानुसार, दिड महिना पाऊस आहे. यावर्षीच्या पावसाचे वैशिष्ठ्य म्हणजे, जून अन्‌ जुलैमध्ये पाऊस झाला नाही. ऑगस्टमध्ये मात्र पाऊस झाला; मात्र ऑगस्टच्य शेवटच्या आठवड्यापासून ते आजपर्यंत पाऊस झाला नाही. अधेमधे वृष्टी झाली. आता पाहावे लागेल की, पाऊस पडतो की, तो परतीच्या प्रवासाला लागतो. अनेकांनी हा इंद्रधनुष्याचा खेळ कॅमेरामध्ये "क्‍लिक' केला. व्हिडीओही केले. ही निसर्गाची किमया सोशल नेटवर्किंगच्या अनेक प्लॅटफॉर्मवर "अपलोड'ही केली.

संपादन - अर्चना बनगे