कोल्हापूर - बावडा तीन दिवस "लॉकडाऊन' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

परिसरातील किराणा दुकानासह भाजी मंडई बंद राहील. औषध दुकाने व दूध संकलनासाठी डेअऱ्या काही वेळापुरत्याच उघड्या ठेवल्या जातील. या व्यतिरिक्त एकही व्यवसाय सुरू न ठेवण्याबरोबच ग्रामस्थांनी घराबाहेरही न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

कोल्हापूर - कसबा बावड्यातील मराठा कॉलनीत कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण सापडल्याच्या पार्श्‍वभुमीवर उद्यापासून (ता. 7) कसबा बावड्यासह लाईन बाजार परिसर सलग तीन दिवस पूर्ण "लॉकडाऊन' करण्याचा निर्णय आज ग्रामस्थांच्यावतीने घेण्यात आला. या काळात या परिसरातील किराणा दुकानासह भाजी मंडई बंद राहील. औषध दुकाने व दूध संकलनासाठी डेअऱ्या काही वेळापुरत्याच उघड्या ठेवल्या जातील. या व्यतिरिक्त एकही व्यवसाय सुरू न ठेवण्याबरोबच ग्रामस्थांनी घराबाहेरही न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

यापुर्वी कोल्हापूर शहरातील भक्तीपूजानगरमध्ये कोरोनाचे एकाच कुटुंबातील दोन रूग्ण सापडले होते. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. पण गेल्या दहा दिवसांपासून शहरात किंवा जिल्ह्यातही कोरोनाचा पॉझीटीव्ह रूग्ण न सापडल्याने बावडा आणि परिसरात संचारबंदीत शिथिल झाल्यासारखी स्थिती होती. विशेषतः या परिसरातील भाजी मंडई व किराणा दुकानात मोठी गर्दी होत होती, त्यातही सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम न पाळता लोक गर्दी करत होते. तेव्हापासूनच बावड्यात तीन दिवस लॉकडाऊन करण्याची मागणी होत होती. 

आज दुपारी मराठा कॉलनीतील महिलेचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीन या कॉलनीसह बावड्यातील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक तर बंद केलीच पण रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्यांच्या दुचाकी जप्त केल्या. यात शेती कामासाठी शेतात गेलेल्या काही शेतकऱ्यांचीही वाहने जप्त करण्यात आली. सायंकाळी बावड्यातील काही प्रतिष्ठित नागरीकांना फोनवरून चर्चा करून उद्यापासून बावड्यातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. गुरूवारपर्यंत (ता. 9) बावडा व लाईन बाजार परिसर पूर्णपणे लॉकडाऊन राहील असे जाहीर करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur bawada Three days lock down corona virus