Covid19 Update: ३६ रुग्णवाहिका सज्ज;  १०८ ची सेवा गतिमान

kolhapur district 36 ambulances ready covid 19 healthy marathi news
kolhapur district 36 ambulances ready covid 19 healthy marathi news

कोल्हापूर: कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असताना गंभीर रुग्णांना घर ते शासकीय रुग्णालयापर्यंत पोचविण्यासाठी १०८ रुग्णवाहिका वरदान ठरली आहे. वर्षभरात जवळपास १९ हजार ५०० कोरोनाबाधितांची वाहतूक करीत त्यांना जीवदान दिले आहे. त्यामुळे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य विभाग यांच्यातर्फे या सेवेचा गौरव करण्यात आला, तसेच यंदाच्या कोरोनाकाळात जिल्हाभरातील सर्वच ३६ रुग्णवाहिका गरजेनुसार कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी वापरण्यात येणार आहेत. 


जिल्हाभरात ३६ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यात सीपीआर रुग्णालय व शहरातील तीन रुग्णवाहिका, तर उर्वरित सर्व ग्रामीण भागात विशेष तालुक्‍याच्या ठिकाणी राज्य व महामार्गालगतच्या भागात रुग्णवाहिका आहेत. कोणीही गंभीर आजारी असेल किंवा दुर्घटनेत जखमी झाले असेल तर त्याला तातडीने रुग्णालयात मोफत पोचविण्याची व्यवस्था १०८ मार्फत केली जाते. १०८ हा टोल क्रमांक आहे. त्याला फोन करून घटनास्थळाचा अचूक पत्ता सांगितल्यास अवघ्या दहा मिनिटांत रुग्णवाहिका घटनास्थळी येते. काही वेळा अंतर लांब असेल तर वेळही लागतो. 


गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. डोंगरी तालुक्‍यात सर्वाधिक कोरोनाबाधित सापडले. त्यांची ने-आण १०८ रुग्णवाहिकेने केली. दिवसाला किमान १० ते २५ रुग्ण ‘सीपीआर’मध्ये आणले जात होते. त्यासाठी कमीत कमी १० किलोमीटर ते ७० किलोमीटरचा प्रवास रुग्णासाठी रुग्णवाहिकेला करावा लागत होता. यंदाही गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यानुसार कोरोनाबाधितांची, यातही गंभीर रुग्णांची वाहतूक पुन्हा सुरू झाली. गाव, वाडी, वस्तीवरील घरातून रुग्ण घेऊन त्याला तालुक्‍याच्या ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा त्यांच्या मागणीनुसार खासगी रुग्णालयातही सोडले जाते; तर अधिक गंभीर रुग्णांना थेट कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातही आणले जाते.

सक्षमपणे वापर करणार
गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या २०० च्यावर येत आहे. यात रोज चार-पाच व्यक्ती गंभीर किंवा अतिगंभीर सापडतात. त्यांची वाहतूक याच रुग्णवाहिकेतून केली जाते. येत्या काळातही कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यास १०८ रुग्णवाहिकेचा वापर अधिक सक्षमपणे करता यावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व १०८ रुग्णवाहिका कोरोनासाठी वापरण्यात येणार आहेत. प्रत्येक वेळी या रुग्णवाहिका सॅनिटाईज केल्या जातील.  

यंदाच्या कोरोना संकटात नव्याने १०८ रुग्णवाहिका सेवांसाठी सतर्क आहेत. ॲडव्हान्स लाईफ सपोर्टच्या आठ रुग्णवाहिका आहेत. यात व्हेंटिलेटर, डीफिलेडीलेटर, व्हॅल्वोमेट्रिक इनफ्युजन मेट्रिक पंप अशा उपचारपूरक अत्याधुनिक सुविधा आहेत. बेसिक लाईफ सपोर्टच्या २८ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यात ऑक्‍सिमीटर, ऑक्‍सिजन व अन्य उपचारपूरक सुविधा आहेत. त्यामुळे रुग्णांना झटपट प्रथमोपचारासाठी दवाखान्यात नेले जाते.’’ 
- डॉ. संग्राम मोरे, जिल्हा व्यवस्थापक समन्वयक

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com