
कोरोनाचे कारण सांगून राज्य सहकारी प्राधिकरणाने आतापर्यंत सहावेळा सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलेल्या आहेत
कोल्हापूर : उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असलेल्या संस्था वगळून इतर संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या सहकार प्राधिकरणाच्या आदेशा विरोधात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ) आज उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यावरील सुनावणी सोमवारी (ता. 8) आहे.
दरम्यान, उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या संस्थांच्या निवडणुकांना कोरोनाचा धोका नाही का ? असा सवाल यापुर्वीही उपस्थित झाला होता. या पार्श्वभुमीवर या आदेशानुसार सुरू असलेल्या निवडणुकांनाही कोरोनाच्या कारणामुळे स्थगिती मिळावी, अशी मागणी "गोकुळ' ने याचिकेत केली आहे.
कोरोनाचे कारण सांगून राज्य सहकारी प्राधिकरणाने आतापर्यंत सहावेळा सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलेल्या आहेत. 24 फेब्रुवारी रोजी शेवटचा आदेश प्राधिकरणाने काढला. त्यातही उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या संस्था वगळून इतर संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. यापुर्वी 4 फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशाविरोधात काही संस्था न्यायालयात गेल्या होत्या. त्यात "गोकुळ' ची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर 10 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने निकाल देताना तत्काळ निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचा आधार घेऊन "गोकुळ' ची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात यापुर्वीच "गोकुळ' ने दाखल केलेली याचिका मागे घेतली, त्यामुळे "गोकुळ' च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता.
आता "गोकुळ' ने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या निवडणुकांनाच स्थगितीची मागणी केली आहे. "गोकुळ' च्यावतीने ज्येष्ठ वकिल ऍड. वाय. एस. जहांगीरदार यांनी ही याचिका दाखल केली. सोमवारी (ता. 8) यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
संपादन - धनाजी सुर्वे