धक्कादायक : वाहतूक समस्येचा आतापर्यंतच्या प्रस्तावात उल्लेखच नाही

kolhapur extension information by omkar dharmadhikari
kolhapur extension information by omkar dharmadhikari

कोल्हापूर : शहर हे जिल्ह्याच्या दळणवळणाचे केंद्र आहे. शहरातील वाहने, राज्याच्या अन्य भागांतून जिल्ह्यातील गावांमध्ये जाणारी वाहने, कोकणात जाणारी वाहने ही शहरातून जातात. एसटी बसचे मार्गही शहरातूनच आहेत. शहरातील वाहनांच्या वाढत्या संख्येला रस्ते अपुरे पडत आहेत. 

पर्यायाने शहरातील वाहतुकीचा वेगच मंदावला आहे. सातत्याने अपघात होऊ लागले आहेत. दरवर्षी जिल्ह्यात नवी ८० हजार वाहने वाढतात. वाहतूक कोंडी नित्याची झाली. मात्र, हद्दवाढ न झाल्याने वाहतूक यंत्रणेवरील ताण किती वाढला आहे, याचा पुसटसा उल्लेखही महापालिकेच्या हद्दवाढ प्रस्तावात नाही. सक्षम आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था हा शहरीकरणातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. ही व्यवस्था जर योग्य नसेल तर नागरिकांचा प्रवास सुखकर व सुरक्षित राहत नाही, याची प्रचिती गेल्या कित्येक वर्षांपासून कोल्हापूरकर घेत आहेत. 


शहरातील प्रमुख रस्ते हे कोकणात जाणारी अवजड वाहने, शहरातील दुचाकी, चारचाकी वाहने, केएमटी आणि एसटी बस, व्यापारी, अवजड वाहने यांचा भार सातत्याने वाहत आहेत. शहराचा आकार मर्यादित असल्याने रस्त्यांची रुंदी वाढवता येत नाही. पर्यायाने दरवर्षी रस्त्यावरील वाढत्या वाहनांना रस्ते अरुंद होऊ लागले आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी आणि अपघाताची वाढती संख्या ही शहरवासीयांची डोकेदुखी झाली आहे. 

शहरात दुचाकी आणि चारचाकीच्या अपघातांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. उपनगरे आणि शहराच्या आसपास असणारी गावे यांच्यातून नियमितपणे वाहने शहरात येतात. शहरात रोज ६८० एसटी बस येतात आणि जातात. ‘केएमटी’च्या ५८ बस रोज फिरतात. शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या ४.७१ टक्के क्षेत्र हे रस्त्यांनी व्यापले आहे. आता हे रस्ते अपुरे पडत आहेत. शहराभोवतीचा रिंगरोड आणि शहरातील उड्डाणपूल हे स्वप्नवतच आहेत. जिल्ह्याच्या वाहतुकीचा भार शहरातील रस्ते वाहतात. 
जिल्ह्यातील वाहनांची वाढती संख्या, शहरातून जाणाऱ्या एसटी बस, अवजड वाहनांची संख्या यामुळे वाहतूक व्यवस्थेवर येणारा ताण, प्रदूषणात होणारी वाढ याचा त्रोटकसा उल्लेखही हद्दवाढीच्या प्रस्तावात नाही.

शहरातील अपघातांची स्थिती 
वर्ष      अपघात      मृत      गंभीर जखमी
२०१९      १२५      २८      ८०
२०२०      ८९      २३      ५८ 
(लॉकडाउन काळामुळे अपघातांचे प्रमाण कमी आहे.)

वर्ष     नवीन नोंदणी झालेली वाहने 
२०१५-१६      ९६,३८९
२०१६-१७      ८७,९३५
२०१७-१८      ८१,९९३  
२०१८-१९      ८४,८०२ 
२०१९- २०      ८१,१३०
२०२१      ३१,०७८

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com