Success Story : देशातील पहिली पाण्यावर तरंगती शेती: दोन उच्चशिक्षित तरुणांनी केला प्रयोग

सदानंद पाटील
Thursday, 12 November 2020

कोल्हापूरला ॲग्रो हब बनवण्याचे स्वप्न
 

कोल्हापूर : ते दोघे वेगवेगळ्या क्षेत्रातील उच्चशिक्षित. दोघांनाही शेती क्षेत्रात अभिनव करायची आवड. त्यासाठी त्यांनी इस्राईल, कॅनडा, अमेरिका, चीन, हाँगकाँग या देशांना भेटी दिल्या आणि त्यातून ध्यास घेतला देशातील पहिल्या ॲक्‍वाफोनिक अर्थात पाण्यावरच्या तरंगत्या शेतीचा. त्यासाठी ठिकाण ठरले ते हातकणंगले आणि अवघ्या १५ महिन्यांत या तरुणांनी लॅण्डक्राफ्ट या कंपनीच्या माध्यमातून शेती क्षेत्रात जे काम केले, ते दिशादर्शक आहे. या यशस्वी तरुणांचे नाव आहे, मयंक गुप्ता आणि ललित झंवर. 

 मयंक गुप्ता मूळचा हैदराबादचा तर ललित झंवर मुंबईचा. एकाचं शिक्षण आयआयटी मुंबई व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍समधून; तर दुसऱ्याचे शिक्षण लंडनच्याच किंग्जटन विद्यापीठातून, आंतरराष्ट्रीय व्यापार व उद्योजकता या क्षेत्रातील. दोघेही ३१ वर्षांचे तरुण. दोघांनी विविध देशांना भेट देऊन शेती व्यवसायाची निवड केली. त्यासाठी ठिकाणाचा शोध सुरू केला. देशातील सर्व जिल्ह्यांची माहिती घेतल्यानंतर त्यांनी उद्योगासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगलेची निवड केली.  

शेती म्हणजे परवडत नसलेला धंदा. आयुष्यात ज्याला काही करता येत नाही त्याचा उद्योग म्हणजे शेती. अशा पद्धतीने हेटाळणी करणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे काम मयंक व ललित यांनी उभे केले आहे. देशात कोणी केली नसेल अशी शेती करण्याचा निर्धार केल्याने त्यांनी ॲक्‍वाफोनिक शेतीचा प्रयोग सुरू केला. ॲक्‍वाफोनिक हे पाण्याचे छोटे टॅंक बांधून त्यात देशी व विदेशी भाजीपाला कोकोपीटच्या माध्यमातून उगवण्याचे हे तंत्रज्ञान. हायड्रोफोनिक व ॲक्‍वाफोनिकमध्ये मोठा फरक आहे. हायड्रोफोनिकमध्ये रासायनिक खते व रसायनांचा वापर केला जातो; मात्र ॲक्‍वाफोनिकमध्ये मत्स्यपालन करून माशांची जी विष्ठा निघते तिचा वापर करून शेती केली जाते. त्यामुळे अमेरिकेत या शेतीला सेंद्रिय शेती म्हणूनच ओळखले जाते. मयंक व ललित यांचा हा नावीन्यपूर्ण प्रयोग चांगलाच यशस्वी झाला आहे.  

१०० एकरांवर करार शेती
भाजीपाल्याला मोठे मार्केट आहे; मात्र उत्पादन घेण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे जवळपास १०० शेतकऱ्यांसोबत १०० एकरांचे करार केले आहेत. पाणी, माती परीक्षण करून पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. शेतीमाल बांधावरूनच संकलित केला जातो. वर्षभर एकच दर देण्यात येतो. हा दर बाजारभावापेक्षा अधिक असतो.  

रोज तीन टन भाजीपाला विक्री
दररोज तीन टन भाजीपाला संकलित केला जातो. हा माल फॅक्‍टरीत आणून त्याचे पॅकिंग केले जाते. त्यानंतर पॅकिंग केलेला माल बाजारपेठ व शहरांच्या मागणीनुसार पाठवण्यात येतो. या सर्व प्रक्रियेत महिलांचा मोठा रोल आहे. या ठिकाणी सुमारे १०० लोक काम करतात. १० हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो. लॉकडाउनपूर्वी जर्मनी, सिंगापूरसह विविध देशांत भाजीपाला पाठवला जात होता. 

हेही वाचा- पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर -

कोल्हापूरच का?
शेतीच्या अनुषंगाने देशभरातील सर्व जिल्ह्यांचा अभ्यास केला. यामध्ये हवामान, शेतीच्या पद्धती, शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन, पाण्याची व्यवस्था तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दळणवळण या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याला पसंती दिली. कोल्हापूर येथून मुंबई, पुणे, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई, सुरत अशा कोणत्याही शहरात रात्रीत पोचता येते. कोल्हापूरपासून सांगली व सोलापूर जवळ आहे. येथील हवामान व पिकांचे उत्पादन वेगळे आहे. तर कोकणमधील पिकांचा उपयोग करून घेण्यासारखा असल्याने कोल्हापूरची निवड केली.

१५ महिन्यांत काय झाले?
मयंक व ललित यांनी इचलकरंजी येथील सहकाऱ्याच्या मदतीने हातकणंगले येथे दोन एकर जागा घेतली. या ठिकाणी ग्रीन हाउस उभे करून आतमध्ये    ॲक्‍वाफोनिक शेतीसाठी पाण्याचे टॅंक बांधले. तीन बोअरवेल खोदून हे सर्व पाणी फिल्टर करून या टॅंकमध्ये सोडण्यात आले. तसेच मत्स्य शेतीसाठी १३० टॅंक बांधले. यामध्ये ३० टन मासे आहेत. माशांची विष्ठा संकलित करून ते खाद्य शेतीला दिले जाते. ४० प्रकारचा भाजीपाला घेतला जातो. २ लाख २० प्लॅन्ट लावले आहेत. ही सर्व शेती उभारण्यासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च आला असून, मयंक यांनी आपली कंपनी विकून पैसा उभा केला आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur Hatkanangale is the first floating farm in the country