‘करवीर धून’ची शान आजही आहे कायम

लुमाकांत नलवडे 
Sunday, 28 June 2020

ही धून केवळ ज्या ठिकाणी श्रीमंत शाहू महाराज उपस्थित आहेत, त्याच ठिकाणी वाजवली जाते

कोल्हापूर - लवाजमा क्रमांक एकसाठी खास तयार केलेल्या ‘करवीर धून’ ची शान आजही कायम आहे. राजाराम रायफलपासून सुरू झालेली ही धून पुढे कोल्हापूर पोलिसांकडून वाजविली जाते. पोलिस बॅण्डकडून वाजवली जाणारी ही धून केवळ ज्या ठिकाणी श्रीमंत शाहू महाराज उपस्थित आहेत, त्याच ठिकाणी वाजवली जाते, तर अंबाबाईच्या मंदिरात नवरात्रीत नऊ दिवस ही धून वाजविल्यानंतरच पालखीचे मंदिरातून प्रस्तान होते.
करवीर संस्थानातील सैनिकांकडून ही धून तयार केली आहे. राजाराम राफयल्समध्ये राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना देण्यासाठी ही धून तयार केली आहे. संस्थाने विलीन झाल्यानंतर पोलिस बॅण्डकडून ती वाजवली जाते. दसऱ्यावेळी शाहू महाराज मेबॅक गाडीतून उतरल्यानंतर पोलिस बॅण्डकडून ‘करवीर धून’ वाजवली जाते. नंतरच महाराज त्यांच्या आसनाकडे रवाना होतात. शाहू जयंतीनिमित्त श्रीमंत शाहू महाराज राजर्षींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात त्यावेळी ही धून वाजवली जाते.

पोलिस बॅण्डचे बॅण्डमेजर 
श्रीकांत कोरवी यांच्याकडून ही धून आजही जपली आहे. या बॅण्डमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. नव्या राजवाड्यातील संग्रहालयात या धूनचे नोटेशन आणि शब्दसुद्धा आहेत. 

‘करवीर धून’ म्हणजे संस्थानेच राज्य गीत
‘करवीर धून’ म्हणजे जुन्या काळातील करवीर संस्थानेच राज्य गीत आहे. ‘हे जगदंबावर करूनेशा भक्तप्रियकर शंभो ठेवी निरामय’, असे त्याचे बोल आहेत. ‘छत्रपती सॅल्युट’ म्हणूनसुद्धा या धूनला ओळखले जाते. भवानी आणि शंकर यांच्याकडे केलेली ही प्रार्थना आहे. आमच्या राज्याचे आयुष्य  निरोगी राहू दे, ताकद येऊ दे, अखंडपणे विजयी होऊ दे, अशी प्रार्थना या धूनमधून केली जाते.

वाद्यवृंदाचे शिलेदार
  श्रीकांत कोरवी - बी प्लॅट ट्रंम्पेट   अशोक कोरवी -साईड ड्रम, रोटो   रमेश जाधव - बी प्लॅट ट्रंम्पेट   सिकंदर शेख ः इम्फोनियम 
  सुरेश जाधव ः अल्टो सॉक्‍सफोन   मोहन इंगळे ः बेस ड्रम  जावेद पठाण ः इम्फोनियम   योगेश वावरे ः बी प्लॅट ट्रंम्पेट   वसीम मुल्ला ः बी प्लॅट ट्रंम्पेट   प्रतिभा पाटील ः स्लाईड ट्राबोन   अश्‍विनी पाटील ः अल्टो सॉक्‍सफोन   रमीज मुल्ला ः  बी प्लॅट ट्रंम्पेट   शहाबाज गवंडी ः बीप्लॅट क्‍लॉरनेट   प्यारेलाल मुल्ला ः  बी प्लॅट ट्रंम्पेट

सध्या १४ जणांचा हा वाद्यवृंद आहे. रोजची ड्युटी सांभाळून सराव होतो. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार बॅण्डला वेळ दिला जातो. मान्यवरांना मानवंदना देण्याचा मान या बॅण्डकडे आहे.  
- सत्यवान माशाळकर, पोलिस निरीक्षक.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur karveer band party