Video : कोल्हापुरात पावसाचा प्रकोप ; १७४ कुटुंबाचे स्थलांतर , प्रापंचिक साहित्य गेले वाहून

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

राधानगरी’चे दोन दरवाजे उघडले

कोल्हापूर : जिल्ह्यात आठवड्यापासून मुसळधार पावसाने हैराण केले आहे. पावसाच्या प्रकोपामुळे शेतीसह सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे जिल्ह्यात १७४ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. यातून चार हजार २५६ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला. जिल्ह्यातील शेतात पाणी साचल्याने हजारो हेक्‍टरमधील भात, सोयाबीन अक्षरश: पाण्यावर तरंगत असल्याची स्थिती आहे. 

दरम्यान, रात्री रस्ता खचल्यामुळे करूळ घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे सकाळी सहाला १६ फुटापर्यंत असणारी पंचगंगा नदीची पाणी पातळी रात्री नऊला २२.३ फुटापर्यंत वाढली आहे. २२ बंधारे पाण्याखाली आहेत. तर, ऑक्‍टोबर महिन्यात कळंबा तलाव ओव्हरफ्लो होण्याची पहिलीची वेळ आहे.  

 

हेही वाचा- कर्ज मागणीत 50 टक्के घट -

गेल्या चोवीस तासात पावसाची धार थांबलेली नाही. धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाचे ३ व ६ क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. धरणाच्या सांडव्यातून ७५०, विद्युत विमोचकातून १२०० असा एकूण १९५० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून विसर्ग होत असलेल्या पाण्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढणार आहे. यासाठी नदीकाठच्या गावांनी सर्तक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवारपर्यंत (ता. १७) पावसाचा जोर असा किंवा यापेक्षा वाढण्याची शक्‍यता आहे. पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून नदी, नाले आणि ओढे तुटुंब भरून वाहत आहेत. या पावसाने पिकांची मात्र दैना उडाली आहे. 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांची टीम नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करीत आहे.  

हेही वाचा-कामगारांची नोंदणी होणार आता ऑनलाईन -

 चोवीस तासात झालेला तालुकानिहाय पाऊस :
तालुका*               पाऊस मिलिमीटरमध्ये
हातकणंगले*          ६२.३८
शिरोळ*                 ८०.८६
पन्हाळा*               ८४.२९
शाहूवाडी*             ५३ 
राधानगरी*            ३५.८३
गगनबावडा*           १०८
करवीर*                ९२.५५
कागल*                ४९.४३
गडहिंग्लज*            ३५.५७
भुदरगड*              २१.८०
आजरा*                 २९
चंदगड*                  २४.६७
एकूण*                   ६७७.३८
सरासरी*                ५६.४५
 

सार्वजनिक व खासभी मालमत्तेचे नुकसान 
जिल्ह्यात सुरू असलेल्या मूसळधार पावसामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहे. यातच, अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने जिल्ह्यातील १७४ कुटुंबातील ७६५ व्यक्तिंना तात्पुरते स्थलांतरित केले आहे. तर, सार्वजनिक २२ व खासगी ६६ मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सुमारे २ लाख ६६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 
 

 
उपनगरात प्रापंचिक साहित्य गेले वाहून 
शहरातील उपनगरातही पावसाचा तडाखा दिला आहे. त्यामुळे, सुर्वेनगर, प्रथमेशनगर, दादू चौगलेनगर, शिंदे नगर येथील घरांमध्ये लोकांच्या घरात ओढ्याचे आणि नाल्याचे पाणी शिरले. यामुळे अनेकांचे प्रापंचिक साहित्य वाहून गेले. 
 

पावसाची क्षणचित्रे 
  कळंबा तलाव ओव्हरफ्लो   काखे पुलावर पाणी
  १५ तासांत पंचगंगेचे पाणीपातळी सहा फुटांनी वाढली
  २२ बंधारे पाण्याखाली   उपनगरातही दाणादाण
  कागलमधील जयसिंगराव तलावाचे तिसऱ्यांदा सांडवे सुटले
  भुदरगड, करवीर, गगनबावडा तालुक्‍यात भात, ऊस भुईसपाट
  पन्हाळ्यात दाट धुके   वारणा धरणातून विसर्ग सुरू
 

हे रस्ते बंद 
करवीर तालुक्‍यातील राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केली. गगनबावडा ते गगनगिरी येथील मोरी वाहून गेल्याने हा रस्ता, तसेच करूळ घाटामध्ये दरड कोसळल्याने वैभववाडीकडे जाणारी वाहतूक बंद आहे. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur Migration of 174 families Two automatic gates of Radhanagari Dam open