मंडलिकांना निवडणुकीत पैरा फेडताना करावी लागणार तारेवरची कसरत

युवराज पाटील
Wednesday, 13 January 2021

पैरा फेडताना खासदारांची कसरत

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीट वाटपाचा गुंता अधिक वाढणार आहे. खासदार प्रा. संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार की विजय देवणे यांच्यापैकी नेमके कोणाकडे तिकीट मागायचे, असा प्रश्‍न इच्छुकांना पडला आहे. ‘आमचं ठरलंय’ने लोकसभा निवडणुकीत मंडलिक यांना मदत केल्याने आता ‘आमचं ठरलंय’च्या उलटी भूमिका मंडलिक यांना घेता येणार नसल्याचे चित्र आहे. 

 
शिवसेनेची तिकिटे देताना त्यांना ‘आमचं ठरलंय’चा पहिल्यांदा विचार करावा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर यांच्या उलटे काम केलेल्यांना आता तिकिटासाठी प्रा. मंडलिक किंवा पवार हेच आधार आहेत. जरी त्यांना तिकीट मिळाले तरी शिवसेनेच्या एका गटाकडून त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे. तिकीट मिळूच नये यासाठी प्रयत्न होतील आणि मिळाले तरी थेट विरोधी उमेदवाराला मदत केली जाईल. 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सर्व जण प्रा. मंडलिक यांच्या पाठीशी राहिले. आता मंडलिक यांना निवडणुकीचा पैरा फेडताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तिकीट नाही द्यावे तरी अडचण आणि द्यावे तर ‘आमचं ठरलंय’चे म्हणणे काय आहे, ते आधी ऐकून घ्यावे लागेल. पालकमंत्री सतेज पाटील आणि क्षीरसागर यांची मते फारशी जुळतात असे नाही. कसबा बावड्यातील सहा प्रभागांत शिवसेनेला कमी क्षमतेचे उमेदवार द्यावे लागणार आहेत. 

‘आमचं ठरलंय’ने लोकसभा निवडणुकीत मदत केल्याने नाइलाजाने शिवसेनेला दोन पावले मागे यावे लागणार आहे. अन्य प्रभागातही जेथे काँग्रेस, राष्ट्रवादीचे ताकदीचे उमेदवार आहेत तेथेही अशीच तडजोड करावी लागेल असे दिसते. मूळ शिवसैनिक सेनेपासून दूर जाण्याची भीती आहे. मोजक्‍या जागा लढण्याचा निर्णय झाल्यास त्याची झळ कट्टर शिवसैनिकांना बसणार आहे. तूर्तास इच्छुक तिकिटासाठी नेत्यांकडे जाऊ लागले आहेत; मात्र तिन्ही पक्ष एकत्र असल्याने ‘तुला तिकीट दिले, कामाला लाग’ असा शब्द देणेही कठीण होऊन बसले आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur municipal corporation atmosphere