कोल्हापूर महापालिका निवडणूक : आरक्षणांवरील हरकतींवर २१ ला सुनावणी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

कोल्हापूर महापालिकेच्या नोंव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडणून आलेल्या सदस्यांची मुदत नोंव्हेंबर २०२० मध्ये संपली

कोल्हापूर - कोल्हापूर महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीवर आलेल्या हरकतीवरची सुनावणी २१ जानेवारीला महापालिकेच्या ताराबाई पार्क उद्यान येथील निवडणूक कार्यालयात सकाळी दहाला होणार आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी होईल. यात विभागीय आयुक्त कार्यालयाचा एक प्रतिनिधी, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिनिधी, महापालिका प्रशासक यांच्या उपस्थितीत ही सुनावणी होणार आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या नोंव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडणून आलेल्या सदस्यांची मुदत नोंव्हेंबर २०२० मध्ये संपली. पण कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर मुदतीपुर्वी निवडणूक घेणे राज्य निवडणूक आयोगाला शक्‍य झाले नाही. त्यामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली. 

निवडणूक प्रक्रिया टप्याटप्याने सुरू करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार गेल्याच महिन्यात २१ डिसेंबर २०२० ला प्रारूप प्रभागरचना आणि आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. कोल्हापूर महापालिकेच्या ८१ प्रभागांचा प्रारूप आराखडा प्रशासनाने जाहीर केला. दरम्यान, या प्रारुप आराखड्यास आणि आरक्षण सोडतीस हरकती घेण्यासाठी २३ डिसेंबर ते ४ जानेवारीपर्यंत हरकती घेण्याची मुदत होती. या मुदतीत ६० हरकती दाखल झाल्या आहेत. प्रभाग आरक्षण सोडत काढताना ८१ पैकी ६० प्रभाग हे थेटच आरक्षीत करण्यात आले.तर केवळ २१ प्रभागासाठीच आरक्षण सोडत काढण्यात आली. 

तर प्रभागरचनेतही मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे स्पष्ट झाल्याने पहिल्या दिवसापासून नागरिकांच्यात या आरक्षण सोडत आणि प्रारुप प्रभागरचनेविषयीच्या तक्रारी वाढत होत्या. हरकती घेण्याच्या मुदतीत ६० तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारीवर आता २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे.यावेळी तक्रारदारांना त्यांचे म्हणने मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत होईल.यावेळी विभागीय आयुक्तांचा एक प्रतिनिधी,जिल्हाधिकाऱ्यांचा एक प्रतिनिधी,महापालिका प्रशासक हे उपस्थित असणार आहेत. महापालिकेच्या ताराबाई उद्यान येथील मुख्य निवडणूक कार्यालयात ही सुनावणी होणार आहे.

दृष्टिक्षेपात प्रक्रिया
 मुदतीत ६० हरकती दाखल 
 ८१ पैकी ६० प्रभाग थेट आरक्षित
 २१ प्रभागांसाठीच आरक्षण सोडत 
 प्रभागरचनेतही मोठ्या प्रमाणात बदल 
 सुनावणी वेळी तक्रारदारांना म्हणणे मांडण्याची संधी

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur municipal corporation election 2021