हात गेला पण बहादराने झाडू नाही सोडला

kolhapur municipal corporation employee bajirao sathe story of motivation in kolhapur
kolhapur municipal corporation employee bajirao sathe story of motivation in kolhapur

कोल्हापूर : तब्बल ३० वर्षांपूर्वी महापालिकेत रुजू होत त्यांनी हातात झाडू घेतला आणि सुरू झाला टिंबर मार्केटमध्ये राहणाऱ्या एका सफाई कामगाराचा प्रवास. इमाने इतबारे सेवा सुरू होती. हातातल्या झाडूच्या आधारेच बाजीराव साठे यांच्या संसाराची चाके पुढे ढकलत होती. पण, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या हाताचा आधारच संपला. कचरा भरताना हाताच्या बोटाला काय तरी टोचल्याचं निमित्त झालं अन्‌ बोटाला जखम झाली. संपूर्ण हातात जीवघेण्या कळा सुरू झाल्या. शेवटी सीपीआर गाठलं. डॉक्‍टरांनी थेट सांगितलं, ‘हाताला गॅंगरीन झालंय, हात काढावा लागेल. नाही तर जीवावर बेतेल’.

बाजीरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. निदान जीव तरी वाचेल म्हणून त्यांनी तयारी दर्शवली. त्यांचा हात काढला. आपल्यावर ही वेळ आली; पण अशी अन्य कुणावर नको, आपल्या या दुखण्याची अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अशी आशा बाजीराव यांना आहे. शस्त्रक्रिया होऊन दीड महिना लोटला. ज्या उजव्या हातात झाडू घेत कित्येक वर्षे आपण कोल्हापुरातले रस्ते स्वच्छ केले, तो हातच आपण गमावलाय याचं दु:ख उराशी घेत त्यांनी पुन्हा कामावर रुजू व्हायचं ठरवलं. वरिष्ठांनी ऑफिस वर्क दिलं. पण, ते नाकारत झाडू हातात घेण्याचं त्यांनी ठरवलं.

या संकटातून सावरतोय तोवर पत्नी विमल यांची दृष्टी गेली. घरातल्या लक्ष्मीच्या वाट्याला काळोख आला. बाजीराव यांनी महापालिकेत नोकरी व विमल यांनी धुणीभांडी करून तीन मुलं पोसली, मोठी केली. आता पतीला हात नाही अन्‌ पत्नीला दृष्टी नाही. हा अपंग संसार हाकायचा कसा, असा प्रश्न या जोडप्यापुढे होता. हार न मानता बाजीरावांनी काम सुरू ठेवलं, पत्नीला आधार दिला. घराच्या दुरुस्तीसाठी, उपचारांसाठी कर्जाचा बोजा डोक्‍यावर आहे; पण जगणं, लढणं मात्र सुरूच आहे.

प्रशासनाकडून सन्मानाची अपेक्षा

कोरोना महामारीतही बाजीराव हातात झाडू घेत पापाची तिकटी, महापालिका परिसर स्वच्छ करण्यात आघाडीवर आहेत. रस्ते स्वच्छ राहावेत, कोल्हापूरकरांचे आरोग्य स्वस्थ राहावे, यासाठी रात्रपाळीतही डाव्या हातात झाडू घेत कोरोना योद्धा म्हणून काम करीत आहेत. पत्नीला तसेच स्वत:ला आलेल्या अपंगत्वाला बाजूला सारत स्वच्छतेचा धर्म त्यांनी सोडलेला नाही. अधिकारी येतात-जातात, सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या अनेकदा बदलतात अन्‌ अशा उपेक्षित कामगारांचं जगणं मात्र कष्टमयच राहतं. या कर्तव्यशील कर्मचाऱ्यांचा सन्मान करणं प्रशासन मात्र विसरलं आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com