कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक ; गोकुळचे दूध रोखण्याचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

महादेव वाघमोडे
Thursday, 17 September 2020

आंदोलकांच्या वतीने पोलीस भरती आणि इतर सर्व भरती आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

उजळाईवाडी (कोल्हापूर) : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईचा दूध पुरवठा रोखून सरकारची कोंडी करण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ दूध) गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे सकल मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करीत कोल्हापूरहून मुंबईला  दूध पुरवठा रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

हेही वाचा - आमदार विनय कोरेंच्या वाटचालीत हा आहे हुकमी नंबर 

आंदोलकांच्या वतीने पोलीस भरती आणि इतर सर्व भरती आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने ठोस भूमिका मांडण्यासाठी सोमवार पर्यंतचा अल्टीमेट सरकारला यावेळी देण्यात आला. सरकारने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावे अन्यथा सोमवारपासून वर्षा बंगला, मातोश्री बंगला यासह सर्वच मुंबईकरांना काळा चहा पिण्याची वेळ येईल. कोल्हापूर व इतर सर्व ठिकाणांवरून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखून मुंबईची रसद तोडून गनिमीकाव्याने आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला. 

हेही वाचा - वैद्यकीय सुविधांसाठी पुढाकार घेणार ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करीत आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलीस बंदोबस्तात गोकुळ दूध संघाचे कामकाज पूर्ववत झाले असून दूध पुरवठा  सुरू झाला आहे. यावेळी गोकुळ दूध संघ , गोकुळ शिरगाव, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग अशा अनेक ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने जमावबंदी आदेशाचे पालन करीत शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन पोलीसांनी आंदोलकांना केले आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha andolan protest against state government gokul milk not send to mumbai from kolhapur