
विक्रमनगर प्रभागातून थोडे कमी मताधिक्य मिळाले; मात्र टेंबलाईवाडी प्रभागात अपेक्षेपेक्षाही अधिक मताधिक्याने विजय मिळाला.
कोल्हापूर : महापालिका निवडणुकांच्या इतिहासात दोन प्रभागांत निवडणूक लढवून दोन्ही प्रभागांतून निवडून येण्याची किमया रेखा पाटील यांनी साधली होती. लोकांच्या आग्रहाखातर टेंबलाईवाडी आणि विक्रमनगर या दोन्ही प्रभागांतून त्यांनी एकाच वेळी 1995 मध्ये निवडणूक लढवली होती आणि दोन्ही प्रभागांसाठी "उगवता सूर्य' हेच चिन्ह होते. रेखा पाटील यांचे नुकतेच निधन झाले आणि या साऱ्या स्मृतींना पुन्हा उजाळा मिळू लागला आहे. या निवडणुकीच्या आठवणी दत्तात्रय बोळके (महाराज) यांनी "सकाळ'शी शेअर केल्या.
(कै.) रेखा पाटील यांचे पती सुरेश पाटील यांचा पूर्वीच्या निवडणुकांत अगदी 70 ते 75 मतांनी पराभव झाला होता आणि तो कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. 1995 ची निवडणूक जाहीर झाली आणि सुरेश पाटील यांनी स्वतःऐवजी रेखा पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. कार्यकर्त्यांनीही मग तोच विचार बोलून दाखवल्यानंतर त्यांची उमेदवारी अंतिम झाली. सुरवातीला टेंबलाईवाडी आणि विक्रमनगर या दोन्ही प्रभागांतून उमेदवारी अर्ज दाखल केले. कारण या दोन्ही प्रभागात नवा चेहरा असावा, अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती. विजय होणार की नाही याची खात्री नव्हती; पण दोन्ही प्रभागांत प्रचाराचे नेटके नियोजन करायचे आणि "उंबरा टू उंबरा' आपली भूमिका पटवून देण्याचा संकल्प सर्वांनी करत दोन्ही प्रभागांतून उमेदवारी कायम ठेवली.
रेखा पाटील या गृहिणी; पण दोन्ही प्रभागांतून उमेदवारी कायम ठेवल्यानंतर प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांनी पायाला भिंगरी बांधली. कार्यकर्त्यांनी दोन्ही प्रभागांतील प्रचाराचे स्वतंत्र नियोजन करून ते काटेकोरपणे पाळण्यावर भर दिला. केवळ चहा आणि बिस्किटांवर कार्यकर्त्यांची फळी राबत होती. कधी तरी मिळाला तर वडापाव. मात्र, निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्व मंडळींनी विजयासाठी कंबर कसली होती. त्यामुळे कुठल्या प्रभागात कुठल्या गल्लीतून किती मतदान पडणार, याची उत्सुकताही अखेरच्या क्षणापर्यंत साऱ्यांनाच होती. प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली आणि साऱ्यांचीच धाकधूक वाढली आणि दोन्ही प्रभागांचा निकाल लागताच एकच जल्लोष सुरू झाला.
हेही वाचा-कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवेस सुरू
विक्रमनगर प्रभागातून थोडे कमी मताधिक्य मिळाले; मात्र टेंबलाईवाडी प्रभागात अपेक्षेपेक्षाही अधिक मताधिक्याने विजय मिळाला. पुढे नियमाप्रमाणे दोन्हीपैकी एका प्रभागातून राजीनामा देणे आवश्यकच होते. पुन्हा कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली गेली आणि विक्रमनगर प्रभागातून राजीनामा देण्याचा निर्णय झाला. या प्रभागातून राजीनामा दिल्यानंतर तेथे दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवाराला संधी देण्यात आली होती, असेही श्री. बोळके यांनी सांगितले.
संपादन- अर्चना बनगे