कोल्हापूर नवदुर्गा स्पेशल स्टोरी : संघर्षाच्या काळात शेतीमालावर प्रक्रिया करून जॅम, सॉस पोचवले घरोघरी

नंदिनी नरेवाडी
Saturday, 17 October 2020

आर. के. नगरातील मीनल भोसले यांची यशोगाथा :संघर्षाच्या काळात रोवली व्यवसायाची मुहूर्तमेढ

कोल्हापूर : जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाने मार्चमध्ये आपल्या देशातही प्रवेश केला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन जाहीर झाला. या काळात अनेक जणांना विविध समस्या सतावू लागल्या. काही महिलांनी गुणवत्ता सिद्ध करत या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. समाजातील गरजू, अडले-नडलेल्यांना मदतीचा हात देत जणू ‘लक्ष्मी’चेच रूप घेतले. कोरोना काळातही सामाजिक बांधिलकी जपून समस्या सोडविणाऱ्या या नवदुर्गांची ओळख आजपासून...

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन झाला. उद्योग, व्यवसाय डबघाईला आले. बेरोजगारी व चिंतेचे ढग दाटले. अशा स्थितीत आर. के. नगरातील मीनल भोसले या दुर्गा धैर्याने पुढे सरसावल्या. या काळात जो शेतीमाल खपत नव्हता, जागेवर सडत होता, तो चांगल्या भावात खरेदी केला. त्यावर प्रक्रिया केली. जॅम, सॉस, पल्प बनवून लॉकडाउन काळात घरोघरी पोचवले आणि बुडत्या काळातही कोल्हापुरात व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. स्वतःच्या अर्थार्जनासोबत इतरांचे अर्थार्जन घडवत बेरोजगारांना रोजगार दिला. त्यातूनच ‘जगा व जगू द्या’ हा संदेश अधिक दृढ केला. 

आर. के. नगरातील मीनल भोसले या फळप्रक्रिया उद्योग चालवतात. टोमॅटो, आंबा, चिंच या फळांवर प्रक्रिया करून त्यापासून जॅम, सॉस व पल्प असे चविष्ट पदार्थ तयार करतात. लॉकडाउनमध्ये व्यवसाय थंडावेल, अशी भीती त्यांनाही वाटू लागली. मात्र, लॉकडाउन काळात शेतकरी शेतीमाल बाजारपेठेत आणू शकत नव्हते. परिणामी, त्यांचा माल शेतातच सडत होता. वर्षभर कष्ट करून पिकवलेल्या मालाचे नुकसान होणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली. याची जाणीव मीनल भोसले यांना झाली. त्यांनी पुढाकार घेत या शेतकऱ्यांना त्यावर प्रक्रियेचा उपाय सुचविला. याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनीही त्यांचा माल भोसले यांच्याकडे आणून दिला.

हेही वाचा- तोफेची सलामी आणि‌ घटस्थापना...! करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ -

जयसिंगपूर, सांगली, वारणानगर, वडगाव, तळसंदे, देवगड, मलकापूर, धारवाड येथील शेतकऱ्यांनी शेतीमाल मीनल भोसले यांच्याकडे पाठवला. काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे शेतीमाल देऊन प्रक्रिया केलेले पदार्थ बनवून घेतले. काहींनी आपला मालच त्यांना विकला. त्याचवेळी बाजारपेठेतही मोठमोठ्या कंपन्यांचे पदार्थ येत नव्हते. ग्राहकांनाही हे पदार्थ सहसा बाजारात उपलब्ध होत नव्हते. मीनल भोसले यांनी तयार केलेले पदार्थ त्यांना उपलब्ध करून दिले. त्यांच्या या दृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसानही झाले नाही आणि बाजारातही पदार्थ सहज उपलब्ध झाले.

हेही वाचा- सनई, तुतारी, ढोल, ताशाच्या निनादात दख्खनचा राजा श्री . जोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सवास प्रारंभ - 

लॉकडाउन काळात शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल बाजारात आणणे शक्‍य नव्हते. कोरोनाचा धोकाही होता. परिणामी हा माल कुजून नुकसान सहन करावे लागले असते. यावर पर्याय शोधत मालावर प्रक्रिया करून त्यांचे नुकसान होण्यापासून वाचविले, याचे समाधान वाटते. 
- मीनल भोसले

महिलांना सुरक्षा आणि रोजगारही
लॉकडाउनमध्ये सगळेच व्यवसाय, उद्योग, कार्यालये बंद होती. अशा वेळी हातावर पोट असलेल्या अनेकांना उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्‍न होता. अशा महिलांना मीनल भोसले यांनी या उद्योगातून रोजगाराची संधी दिली. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत प्रक्रिया उद्योगातून त्यांना रोजगार दिला.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur navdurga festival story Identification of these new forts that solve problems by maintaining social commitment