राज्याच्या महिला फुटबॉलमध्ये वर्चस्व, मात्र विश्‍वचषकमध्ये कोल्हापूर नाहीच

दीपक कुपन्नावर
Wednesday, 15 July 2020

यंदा होणारी विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली. आता पुढील वर्षी 17 फेब्रुवारी ते 7 मार्चअखेर देशातील पाच केंद्रांवर ही स्पर्धा होईल. कोलकाता, भुवनेश्‍वर, अहमदाबाद, गुवाहाटी, नवी मुंबई या ठिकाणी सामने होतील.

कोल्हापूर : भारतात पुढील वर्षी होणाऱ्या 17 वर्षांखालील महिला विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी संभाव्य संघांची घोषणा झाली आहे. गोव्यात सोमवारपासून (ता. 20) या संघांचे सराव शिबिर होणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) यासाठी 35 खेळाडूंची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातून मुंबईच्या साई संखे, प्रियांका सुजेश, तर पुण्याच्या अंजली बकरेची वर्णी लागली आहे. या यादीत राज्याच्या महिला फुटबॉलमध्ये वर्चस्व असणाऱ्या कोल्हापूरकरांना स्थान मिळालेले नाही. परिणामी, जागतिक फुटबॉलच्या महाकुंभमेळ्यात प्रतिनिधित्व करण्यापासून कोल्हापूरकर वंचित राहणार आहेत. 

यंदा होणारी विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली. आता पुढील वर्षी 17 फेब्रुवारी ते 7 मार्चअखेर देशातील पाच केंद्रांवर ही स्पर्धा होईल. कोलकाता, भुवनेश्‍वर, अहमदाबाद, गुवाहाटी, नवी मुंबई या ठिकाणी सामने होतील. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी यजमान एआयएफएफने जोरदार तयारी सुरू केली आहे. खास करून भारतीय संघाची कामगिरी चांगली व्हावी, यासाठी परदेशी प्रशिक्षकासह खेळाडूंना अनुभवासाठी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धात सहभागाचा आराखडा केला आहे. स्वीडनचे नामवंत थॉमस डिनरबाय हे मुख्य प्रशिक्षक, तर मुंबईचे ऍलेक्‍स ऍम्ब्रोज हे सहायक आहेत. 

तीन वर्षापूर्वी झालेल्या मुलांच्या 17 वर्षाखालील विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरचा अनिकेत जाधव चमकला होता. भारतीय संघात निवडला गेलेला अनिकेत महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू असल्याने कोल्हापूरकरांची मान उंचावली. गौरवशाली शतकाची परंपरा असणाऱ्या या केंद्राने गेल्या दशकभरात महिला फुटबॉलमध्येही भरारी घेतली. गेली दोन वर्षे इंडियन फुटबॉल लिगमध्ये (आय लिग) एफसी कोल्हापूर सिटी चॅम्पियन आहे. त्यात रिवा एफसीनेही छाप पाडली. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (विफा) खुल्या आंतरजिल्हा स्पर्धेत कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनचा (केएसए) संघ उपविजेता आहे. 

दरवर्षी शालेय स्तरावर श्री काडसिध्देश्वर हायस्कूल (कणेरी), शाहू हायस्कूल, उषाराजे हायस्कूल अशा संघातून सरासरी 30 खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होतात. केएसएमार्फत महिला लिग स्पर्धाही होते. या पार्श्‍वभूमीमुळेच केएसएच्या मधुरिमाराजे छत्रपती यांची विफा महिला विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली. तसेच एआयएफएफच्या महिला समिती सदस्यपदीही त्यांची वर्णी लागली. मात्र, आता संभाव्य संघात कोल्हापूरकर नसल्याने सर्वांचीच निराशा झाली आहे. 

दृष्टिकोन वेदनादायी
गेल्या पाच वर्षांत शालेय खेळाडूंनी राज्यस्तरावर वर्चस्व निर्माण केले आहे. मुंबई, पुण्याच्या संघांनाही नमविले. कोल्हापूरच्या खेळाडूकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन वेदनादायी आहे. 
- अमित शिंत्रे, प्रशिक्षक, काडसिद्धेश्वर हायस्कूल, कणेरी 

नवोदित खेळाडूंवर परिणाम
शालेय, सुब्रतो आणि आय लिग अशा सर्वच स्पर्धांत कोल्हापूरचा दबदबा आहे. टॅलेंटमुळेच मोठ्या संख्येने कोल्हापूरच्या मुली दरवर्षी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडल्या जातात. अशा वेळी विश्‍वचषक संभाव्य संघात कोल्हापूरकर नसणे नवोदित खेळाडूंवर परिणाम करणारे ठरू शकते. 
- अमित साळोखे, प्रशिक्षक, रिवा फुटबॉल क्‍लब, कोल्हापूर

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Is Not In The Women's Football World Cup Kolhapur Marathi News