ब्रेकिंग - कोल्‍हापूर-पुणे महामार्गाचा सर्व्हिस रोड पाण्याखाली  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

रस्त्यावर आज शेतकरी संघाचा पेट्रोल पंप आणि हॉटेल जय हिंद दरम्यान पाणी आले. सुमारे दीड ते दोन फूट पाणी रस्त्यावर आहे.

शिरोली पुलाची : संततधार पावसामुळे येथील सेवामार्गावर पाणी आले आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात स्थानिक वाहतूकीसाठी सेवामार्ग बांधले. पंचगंगा पूलापासून शिरोलीतील वाहतूकीसाठी सेवामार्ग बांधला आहे. या मार्गावरील वाहतूक कमीच असते. पार्किंग साठी याचा वापर सर्वाधिक होतो.

रस्त्यावर आज शेतकरी संघाचा पेट्रोल पंप आणि हॉटेल जय हिंद दरम्यान पाणी आले. सुमारे दीड ते दोन फूट पाणी रस्त्यावर आहे. पोलिसांनी बॅरेकेट लावून, या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. पाण्याची पातळी वाढण्याची शक्‍यता असल्याने, या भागातील व्यवसायिकांची साहित्य बाहेर काढण्याची गडबड सुरू होती. 

पूरक्षेत्रातील बांधकामांची चर्चा 
पुलापासून शेतकरी संघाच्या पेट्रोल पंपापर्यंतचा व महामार्गाच्या पूर्वेकडील मार्बल शोरूमपर्यंत शेती आहे. हा परिसर नदीचे पूरक्षेत्र म्हणून ओळखला जातो. या भागात अलीकडेच काही व्यावसायिकांनी भराव टाकून, व्यवसाय सुरु केले. गेल्यावर्षीच्या महापुराने पूरक्षेत्रातील बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पुराचे पाणी ओसरले आणि पूरक्षेत्रातील बांधकामाचा मुद्दा मागे पडला. तो यावर्षीच्या पुरानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. 

राधानगरीचे दोन दरवाजे खुले 
 सलग तीन दिवसांच्या अतिवृष्टीने जुलै महिन्यातील उघडीपीची कसर भरून काढीत अखेर राधानगरीचे "लक्ष्मी' धरण आज पूर्ण क्षमतेने भरले. सायंकाळी सात वाजता सात स्वयंचलित दरवाजांपैकी दोन खुले झाले. यातून 2856 क्‍यूसेक विसर्ग भोगावती नदी पत्रात सुरू झाला आहे. स्वयंचलित दरवाज्यातून आणि वीजनिर्मितीसाठी चौदाशे असे एकूण 4256 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू असल्याने नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

हे पण वाचाब्रेकिंग : पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी ; कोल्हापूरवर महापूराचे सावट

 

आज सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी धरणाच्या एकूण क्षमतेच्या 347.50 फूट पैकी 347.45 फूट इतकी पातळी आल्यानंतर तीन आणि सहा क्रमांकाचा दरवाजा खुला झाला. गतवर्षी 31 जुलैला धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. तेव्हा 2764 मिमी. पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा जुलैमध्ये उघडीप दिल्याने धरण 5 दिवस उशिरा भरले. आज अखेर धरणक्षेत्रावर 2652 मिमी. पाऊस नोंदला आहे. 

संपादन- धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Pune highway service road under water