राजाराम कारखान्याच्या अपात्र सभासदांना उच्च न्यायालयाचा दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी हालचाली सुरू आहेत

शिये : अपात्र सभासदांबाबत सहकारमंत्र्यांच्या निर्णयानंतरच छत्रपती राजाराम साखर कारखान्याची निवडणूक घ्याावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या सुमारे ८१८ सभासदांना दिलासा मिळाला आहे.

प्रादेशिक सहसंचालक (साखर विभाग) कोल्हापूर यांनी १४ फेब्रुवारी २०२० रोजी छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे ८१८ सभासद अपात्र ठरविले.  या निर्णयाविरोधात कारखान्याच्या चार सभासदांनी २६ फेब्रुवारी २०२० रोजी कागदपत्रांची फेर तपासणी करून सर्व सभासद पात्र ठरवावेत अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. 

राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी हालचाली सुरू आहेत.  सत्ताधारी गटातील ८१८ सभासद वगळून यादी प्रसिद्ध होऊ शकते. अपात्र झालेल्या सभासदांचा अंतिम निर्णय सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या समोर होणार आहे. पण अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे हे अपात्र सभासद वगळून यादी प्रसिद्ध केली जावू शकते. त्यामुळे अशी यादी प्रसिद्ध करू नये, तसेच अपात्र सभासदांचा निर्णय चार आठवड्यात द्यावा व पुढील चार आठवड्यात निवडणूक प्रक्रिया पार पाडावी. अशी विनंती अपात्र सभासदांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला करण्यात आली होती. 

कुबेर भातमारे, शकुंतला कदम, दीपक पाटील व वनिता गायकवाड आदी सभासदांच्या वतीने केलेल्या या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. डी. धनुका व व्हि. जी. बिश्त यांनी १४ जानेवारी ला निर्णय दिला आहे. यामध्ये सभासदांच्या अपात्रतेचा विषय सहकार मंत्री यांच्या समोर झाल्यानंतरच निवडणूक कार्यक्रम घेण्यात यावा असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सभासदांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव माने , व्हाईस चेअरमन वसंत बेनाडे,  संचालक दिलीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हे पण वाचा७२ वर्षांपूर्वीच कोल्हापुरात उभारला या  चित्रकाराचा देशातील पहिला पुतळा!  

साखर कारखाने आजपर्यंत सभासदांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असून हे सर्व सभासद पात्र होतील आणि सभासदांना न्याय मिळेल. 
-महादेवराव महाडिक, माजी आमदार 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur Rajaram Factory Member