लॉकडाउनमुळे कोल्हापूरकर विसरले वाहतुकीचे नियम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

लॉकडाउनमुळे कोल्हापूरकर वाहतुकीचे नियमच विसरल्याचे चित्र शहरात दिसले.

कोल्हापूर : लॉकडाउनमुळे कोल्हापूरकर वाहतुकीचे नियमच विसरल्याचे चित्र शहरात दिसले. दिवसभरात दोन हजार वाहनधारकांवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई झाली. कोरोनामुळे 22 मार्चला देशात "जनता कर्फ्यु' पुकारल्यानंतर संपूर्ण रस्ते शांत झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहने रस्त्यावर येण्याचे बंद झाले आणि त्याच पद्धतीने सुरूही झाले. या काळात वाहनधारकांनी वाहतुकीचे नियमच धाब्यावर बसवले आहेत. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा शिस्त लावण्यासाठी वाहनधारकांच्या वाहन चालक परवान्यापासून इतर बाबींची तपासणी सुरू केली आहे. 

लॉकडाउनमुळे अनेक वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. एकेरी मार्गावरून विरुद्ध दिशेने जाणे, वाहनपरवाना जवळ न बाळगणे, मास्क न लावणे, दुचाकीवरून तिब्बल सीट जाणे अशा नियमांचे वारंवार उल्लंघन होत आहे. सिग्नल सुरू असताना पुढे जाण्याऱ्यांची संख्याही वाढली आहे. यामुळे शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांकडून आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून दंडात्मक कारवाईची मोहिमच सुरू केली आहे. पोलिस ठाण्याच्या दारात उभारून खाकी वर्दीतील पोलिसही कारवाई करीत आहेत. 

शहरात फिरताना रस्त्यावर पाच-सहा किलोमीटरच्या अंतरावर दुचाकीस्वारांना अडविले जात आहे. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना विचारला जात आहे. यामध्ये दहा वाहनधारकांना थांबवले तर दोघा-तिघांकडे परवाना नसल्याचे दिसून येत आहे. तसेच एकेरी मार्गाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या पोलिसांना तर प्रत्येक दहा-पंधरा मिनिटांत एका वाहनधारकांकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. याबाबत पोलिसांशी संवाद साधल्यानंतर लॉकडाउनमुळे वाहनधारक नियम विसरलेत अशी स्थिती असल्याचे सांगण्यात आले. 

दिवसभरात दोन हजार वाहनधारकांवर कारवाई केली आहे. वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. अन्यथा अशी कारवाई दररोज करावी लागेल. 
- वसंत बाबर, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा 

दृष्टिक्षेप 
- वाहन चालक परवान्यापासून इतर बाबींची तपासणी सुरू 
- सिग्नल सुरू असतानाच पुढे जाण्याऱ्यांची संख्या वाढली 
- वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाईची मोहिम 
- तिब्बल सीट, मास्क न वापरणाऱ्यांना दंड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur residents forgot traffic rules