"बाते कम काम जादा" : 'पोलिस' हा तुमचा मित्र आहे दाखवणारा अवलिया

सुधाकर काशीद
Friday, 18 September 2020

घोषणा करणारे आणि प्रत्यक्षात काहीही न करता तीन वर्ष "सुख-समृद्धीत" काढणारे अनेक अधिकारी कोल्हापूरकरांनी पाहिले आहेत.

कोल्हापूर : "माझ्या हद्दीत जर कोणी काहीही आगाऊपणा केला तर त्याचं तंगडे मोडले शिवाय राहणार नाही "असं जेव्हा एखादा पोलीस अधिकारी चार चौघात वारंवार वल्गना करत  रहातो त्यावेळी तो फक्त आपल्या तोंडातली वाफ घालवतो हे कोल्हापूरकरांना चांगलं माहिती आहे. कारण अशा घोषणा करणारे आणि प्रत्यक्षात काहीही न करता तीन वर्ष "सुख-समृद्धीत" काढणारे अनेक अधिकारी कोल्हापूरकरांनी पाहिले आहेत.

अर्थात त्याला काही अपवाद ठरले आहेत.  चांगले काम त्यांनी केले आहे.पण ते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. त्यात आणखी एक भर पडली आहे , ती म्हणजे नुकतीच  ज्यांची बदली झाली ते कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक  डॉ.अभिनव देशमुख.हे देशमुख एमबीबीएस.  वैद्यकीय व्यवसाय करत बसू शकले असते. पण त्यात ते रमले नाहीत. युपीएससीची परीक्षा दिली आणि ते असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम झाले.आता तर आपण भलं आपली नोकरी भली असे जगू शकले असते. पण त्यानी आयपीएसची तयारी सुरू केली आणि ते आयपीएस झाले.ठाणे, एस आर पी ,सातारा व त्यानंतर गडचिरोलीसारख्या नक्षलवादी परिसरात त्यांनी काम केले.

हेही वाचा- 101 चं याडचं भारी ; मानसिंगरावांची नित्य सवारी...!

नक्षलवाद्यांशी तोंड देताना त्यांनी जे उपद्रवी आहेत त्यांचा खात्मा आणि जे नक्षलवादी सुधारण्यास तयार आहेत त्यांचे पुनर्वसन याची अतिशय प्रभावी अंमलबजावणी केली. आणि नक्षलवादी परिसरात अभिनव देशमुख या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली. तेथून बदली झाल्यानंतर  ते कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक झाले. त्यावेळी कोल्हापुरात काळे धंदे जोरात सुरू होते. मटका ,खाजगी सावकारी, जुगार अड्डा वाले, सुपारी दादा , फाळकुट दादा आणि पडद्याआड राहून गुंडगिरीला पाठबळ देणारे  पांढरपेशी "प्रतिष्ठीत " कोल्हापुरात रुबाबात वावरत होते. जणूकाही कोल्हापूरवर आमचीच सत्ता या रुबाबात हे सर्व काळे धंदेवाले आणि त्यांना पाठबळ देणारे काही बेगडी लोक होते.

अभिनव देशमुख यांनी हे सारे पाहिले आणि "बाते कम काम ज्यादा" या पद्धतीने ते कामास लागले. मी मी म्हणणारे, मला पोलीस काही करू शकत नाहीत असे म्हणणारे त्यानी कॉलरला धरून आत घातले. अनेक जण कोल्हापूर सोडून फरार झाले. सकाळी  लॉकअपमध्ये जायचे आणि दुपारी जामिनावर सुटायचे अशी सवय असलेले अनेक जण दोन-दोन तीन-तीन वर्षे जेलच्या आत पिसत राहिले. पोलिसांची ताकद काय असू शकते हे त्यांनी गुंडांना काळे धंदेवाल्यांना आणि  काही बेरकी पुढाऱ्यांना दाखवून दिले. हे करताना त्यांनी सामान्य माणसाला पोलिस हा तुमचा मित्र आहे हे छोट्या-छोट्या कृतीतून दाखवून दिले.

हेही वाचा-कोल्हापूर ते शिनोली : रेल्वेचे 42 कर्मचारी कोरोना बाधित -

पोलीस खात्यातही काही हप्ता बहाद्दर होते त्यांना त्यांनी वेळेत घरी बसवले. 2019 च्या महापुरात सलग 20 ते 22 दिवस पाण्यात उभे राहून काम केले. हे करताना आपल्या अधिकाऱ्यांना सहकाऱ्यांना आपल्या सोबत कायम घेतले. चांगले काम करणाऱ्या पोलिसांना दर महिन्याला जाहीर समारंभात बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्याची परंपरा त्यांनी चालू केली. जो चांगले काम करतो त्याच्या पाठीवर थाप आणि जो पोलीस दलाची प्रतिमा खराब करतो त्याला झटका देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. फार न बोलता एखादा अधिकारी किती चांगले काम करू शकतो याचे दर्शन अभिनव देशमुख यांनी त्यांच्या कोल्हापुरातील कारकिर्दीत घडवले .

काळे धंदे व गुंडावरचा त्यांचा धडाका काहीजणांना आवडत नव्हता पण पण मी मी म्हणणाऱ्यानी याविरोधात कधी तोंड उघडण्याचे धाडस केले नाही .त्यांच्या पत्नी सोनाली याही डॉक्टर. त्या स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारी लाड परिवारातल्या.  आता कोरोनाच्या काळात त्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवेत होत्या. "मी डीएसपीची बायको" हा भाव कधीच दाखवत नव्हत्या.कोरोना योद्धा म्हणून वावरत नव्हत्या.आता डॉ अभिनव देशमुख यांची बदली झाली आहे. आम्हा कोल्हापूरकरा कडून त्यांच्या कारकिर्दीचे कौतुक व भावी वाटचालीस शुभेच्छा. नवे पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे  यांचे स्वागत

 संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Superintendent of Police Dr Abhinav Deshmukh story by sudhakar kashid