टुरिझम हबव्दारे शाहूविचार जगभर पोहचवू ; खासदार सुप्रिया सुळे 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

पुरोगामी विचारांचा दृष्टा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. त्यांचे विचार आजही कोल्हापुरात रूजलेले आहेत, ही अभिमानाची बाब आहे

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा देणाऱ्या ऐतिहासिक वास्तू कोल्हापुरात आहेत. हा त्यांचा वारसा फक्त देशात नव्हे तर जगभरात पोहचविण्यासाठी कोल्हापुरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे टुरिझम हब बनवू, अशी ग्वाही आज खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. यासाठी कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी लोकप्रतिनिधींना केले. अंबाबाई मंदिर परिसरातील संत गाडगेबाबा महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणाच्या कामांचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. 

कोल्हापूर शहर परिट समाजातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती होते. 
दरम्यान, खासदार सुळे यांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडाच्या नुतनीकरणाच्या कामांची पाहणी केली. 

खासदार सुळे म्हणाल्या, ""पुरोगामी विचारांचा दृष्टा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. त्यांचे विचार आजही कोल्हापुरात रूजलेले आहेत, ही अभिमानाची बाब आहे. त्यांचे विचार संपूर्ण जगभरात पोहचवावे, यासाठी दौऱ्याचे नियोजन केले होते. शाहू महाराजांनी उपेक्षित समाजाच्या उन्नतीसाठी जिल्ह्यात विविध वास्तू उभ्या केल्या. या वास्तूंचे जतन करण्याची जबाबदारी आपल्या पिढीची आहे. याचे काम लवकरच हाती घेणार असून ऍकॅडमीच्या माध्यमातून सुरवातीच्या टप्प्यात त्याचे डॉक्‍युमेंटेशन करणार आहोत. पुढच्या पाच वर्षात हे काम पुर्णत्वाकडे नेणार आहे.'' 

मालोजीराजे छत्रपती म्हणाले, ""राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने चालणारी करवीर नगरी आहे. शहरात ठिकठिकाणी महापुरूषांचे स्मारकरूपी पुतळे उभारले आहेत. ते जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. महापुरूषांच्या पुतळ्याचे जतन, सुशोभिकरण करून त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याठी प्रयत्न करू.'' 

हे पण वाचा - Video : ...तर महाराष्ट्र देशात एक नंबरचे राज्य होईल

 

माजी नगरसेवक आदिल फरास यांनी प्रास्ताविक केले. यावेळी परिट समाजाचे अध्यक्ष प्रकाश भालकर, नगरसेविका सविता भालकर, उपायुक्त रविकांत आडसुळ, नाविद मुश्रीफ, जहिद मुजावर, परिक्षित पन्हाळकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी उपस्थित होते. 
 
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur tourism hub supriya sule chhatrapati shahu maharaj