उलगडले सव्वाशे वर्षापूर्वीचं कोल्हापूर; ब्रिटिश महिला हेलन कॅडीकनं लिहून ठेवल्या होत्या नोंदी 

संभाजी गंडमाळे  : सकाळ वृत्तसेवा 
Friday, 14 August 2020

कोल्हापुरात पोचल्यावर तिचं पहिलं निरीक्षण होतं की इथले रस्ते अतिशय चांगले आहेत आणि इमारती सुंदर आहेत. तिनं अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल, टाऊन हॉलला भेट दिली. टाऊनहॉलच्या बागेत सुंदर गुलाब आहेत आणि तिथंच काही हरणं, इतर प्राणी व पक्षीही आहेत असं ती सांगते

कोल्हापूर :  संस्थानी राजवटीत कोल्हापुरात अनेक ब्रिटिश अधिकारी कामानिमित्त येत-जात असत. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत तर खुद्द भारताचा व्हाईसरॉयही कोल्हापुरात आला होता. हेलन कॅडीक नावाची एक ब्रिटिश महिला सव्वाशे वर्षांपूर्वी कोल्हापुरात येऊन गेली होती आणि तिच्या इथल्या मुक्कामात कोल्हापूर तिला जसं दिसलं ते तिनं नोंदवून ठेवलेलं आहे. यानिमित्तानं सव्वाशे वर्षापूर्वीचं कोल्हापूर पुन्हा उलगडले गेले आहे. संशोधक अभ्यासक यशोधन जोशी यांनी ही माहिती पुढे आणली आहे. ब्रिटीश अर्काईव्हजमधून यांचे संदर्भ त्यांनी शोधले. 

इंग्लडमधल्या बर्मिंगहॅममध्ये जन्मलेली हेलन कॅडीक जगाच्या अभ्यासासाठी बाहेर पडली आणि 20 जानेवारी 1893 ला मुंबईतून कोल्हापुरात आली. त्यावेळी कोल्हापूरला कर्नल वुडहाऊस रेसिडेंट होता. त्याच्याशिवाय दरबार सर्जन डॉ. सिंक्‍लेअर, राजाराम कॉलेजचे प्राचार्य कॅंडी आणि शनॉन नावाचा इंजिनियर यांनी तिचं आदरातिथ्य केलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी अजून राज्यग्रहण केलेलं नव्हतं; पण लवकरच त्यांचा राज्यरोहण समारंभ होणार आहे, हे हेलनने नोंदवून ठेवलेलं आहे. 
कोल्हापुरात पोचल्यावर तिचं पहिलं निरीक्षण होतं की इथले रस्ते अतिशय चांगले आहेत आणि इमारती सुंदर आहेत. तिनं अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल, टाऊन हॉलला भेट दिली. टाऊनहॉलच्या बागेत सुंदर गुलाब आहेत आणि तिथंच काही हरणं, इतर प्राणी व पक्षीही आहेत असं ती सांगते. नवीन राजवाड्याला भेट देऊन तिथलं बांधकाम पूर्ण होत आलेलं तिनं बघितलं. कॅंडीबरोबर ती राजाराम कॉलेज बघून झाल्यावर कॉलेजच्या छतावरून तिला कोल्हापूर फारच रमणीय दिसलं. मिस लिटीलबरोबर नेटिव्ह गर्ल्स हायस्कुल म्हणजे "एमएलजी' शाळाही तिनं बघितली. तिथल्या मुलींनी तिला मराठीतून काही गाणी म्हणून दाखवली. त्यानंतर शनॉनने तिला नगारखाना दाखवला. तिथं अनेक प्रकारची वाद्य आहेत आणि त्यावर "स्टेट फ्लॅग' फडकत असल्याचं ती लिहिते. जुन्या राजवाड्यात जाऊन तिनं तिथल्या अंबाबाईच्या देवळाला भेट दिली. राजाच्या देवीचं हे मंदिर अतिशय सुरेख रंगवलेलं आहे, असं ती सांगते. जुन्या राजवाड्यातच एक सुंदर आईनेमहाल असून, या राजवाड्यात जागोजागी शस्त्रे टांगलेली आहेत, असंही ती सांगते. जुन्या राजवाड्यातच तिची भेट राजघराण्यातल्या काही मंडळींशी झाली. 
हेलनने राणीसाहेबांची भेट घेतली. स्वागतासाठी अनेक गोड पदार्थ हेलनसमोर मांडले गेले आणि ते तिनं आवडीनं चाखून बघितले. दोघीही राणीसाहेबांना विणकामाची फार आवड असून, त्या विणकामात अतिशय तरबेज होत्या. राणीसाहेबांनी तिला आपले दागिने दाखवले. त्याच्यात उंची रत्ने, उत्तमोत्तम हार आणि सोन्याच्या जोडव्या, मासोळ्या आहेत हे ती सांगते. फक्त राजाच्या पत्नीलाच सोनं पायात घालण्याचा अधिकार आहे, हे ही हेलनला माहीत आहे. भेट संपताना राणीसाहेबांनी अत्तर आणि पानसुपारी देऊन तिचा निरोप घेतला. 

बालिंगा अन्‌ पाणीपुरवठा... 
जुन्या राजवाड्याच्याजवळच छत्रपतींची पागा, काही हत्तीही आणि उंटही होते. पागेत उत्तम दर्जाचे घोडे असून, त्यांची कसोशीने निगराणी राखली जाते हे ती आपल्याला सांगते. लाल डगला, पिवळसर सुरवार आणि सोनेरी व निळ्या रंगाची पगडी घालणारे कोल्हापूर रिसाला पथकही तिनं बघितलं. अंबाबाईचे देऊळ हेलनने बघितले, इथं सुंदर नक्षीकाम असून, इथल्या देवतांची गणतीच नाही, असं ती म्हणते. नंतर हेलन डॉ. सिंक्‍लेअर आणि त्याच्या पत्नीबरोबर रंकाळ्यावर गेली. तिनं कळंबाही बघितला आणि तिथून कोल्हापूरला पाणीपुरवठा कशा प्रकारे केला जातो हे जाणून घेतलं. पूर्वी कळंब्यापाशी असणारे बालिंगा गाव नंतर दुसरीकडं वसवलं गेलं, हे आज कोल्हापुरात कित्येकजणांना माहीत नसेल; पण हेलनने याचीही नोंद ठेवलेली आहे. नदीवरच्या छत्रपतींच्या समाधी मंदिरांनाही तिनं भेट दिली होती. इतरही अनेक ठिकाणांना भेट देऊन तिनं तो वृत्तांत सविस्तर लिहून ठेवलेला आहे. 

कोल्हापूरच्या सव्वाशे वर्षांपूर्वीच्या रुपाचं, इथल्या जीवनाचं दर्शन आजवर उजेडात न आलेल्या हेलनच्या या लिखाणातून आपल्याला घडतं जे खरोखरच रमणीय आहे. 
- यशोधन जोशी, इतिहास अभ्यासक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur unveiled three hundred years ago; The notes were written by British woman Helen Cadick