मार्ग काय सापडेना : कोल्हापूरला जायचं म्हणत माऊलीने सोडले प्राण...

kolhapur women Death from a heart attack kolhapur marathi news
kolhapur women Death from a heart attack kolhapur marathi news

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा फैलाव जगभर सुरू झाला आणि कोल्हापुरातून इराकला गेलेले २१ पर्यटक अडकून पडले आहेत. सव्वादोन महिन्यांनंतरही त्यांना कोल्हापुरात येता आलेले नाही. यातील शमसुन्निसा नसिरुद्दीन मोमीन (वय ५९) यांचा आपल्याला कोल्हापूरला जाऊ दे, कुटुंबीयांना भेटू दे, असे म्हणत-म्हणतच काल (ता. ९) राजस्थानमधील जोधपूर येथे हृदयविकाराने मृत्यू झाला. येथून आईला आणण्यासाठी गेलेल्या त्यांचे पुत्र इरफान यांना वापी (गुजरात) सीमेवरून पोलिसांनी पुढे सोडले नाही. ते तेथूनच परतले. आता तेच पुत्र कदमवाडी (कोल्हापूर) येथे आपल्या आईच्या पार्थिवाची वाट पाहत आहेत.   

मक्का-मदिनासाठी कोल्हापूरातुन गेलेले पर्यटक दोन महिने झाले तरीही परतले नाहीत. या पर्यटकांनी २३ फेब्रुवारीला मुंबई सोडली. ते सौदी अरेबियातील जेद्दा शहरात पोचले. त्यानंतर सात दिवस मक्का येथे मुक्काम केला. ते सर्व ३ मार्चला कोल्हापुरात येणारे होते. आज १० एप्रिलनंतरही ते वाटेवरच आहेत. इराक, इराणमध्ये २४ दिवसांच्या प्रवासानंतर जोधपूरमधील एमडीएम दवाखान्यात दाखल असा दोन-सव्वादोन महिन्यांचा प्रवास केलेल्या शमसुन्निसा यांची कोल्हापुरात आपल्या कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली. त्यातच त्यांची आणि पतीची ताटातूट झाली. त्यांना तेथून कोल्हापुरात येता येत नव्हते. 

आईचा वारंवार फोन यायचा. तिला परत कोल्हापुरात घेऊन येण्याचे इरफान यांनी प्रयत्न सुरू केले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून राजस्थानला जाण्याचा पास घेतला. पण, त्यांना महाराष्ट्र-गुजरात सीमेवरूनच परत पाठविण्यात आले. परतताना इरफान यांच्या डोळ्यांतील पाणी थांबता थांबत नव्हते. काल मात्र आईच्या निधनाची बातमी ऐकून इरफान यांच्या पायाखालची वाळू सरकली. काही दिवसांपूर्वी आईला आणण्यासाठी गेलेल्या इरफान यांना आता कदमवाडी येथे तिच्या पार्थिवाची वाट पाहावी लागत आहे. 

मार्ग खुंटलाच!
शमसुन्निसा दोन महिने कुटुंबीयांपासून दूर आहेत. मुलगा इरफान यांच्याशी दूरध्वनीवर या सर्व गोष्टी त्या बोलून दाखवत होत्या. काहीही करा; पण मला कोल्हापुरात घेऊन जा, अशा त्या वारंवार म्हणत होत्या. जिल्हाधिकारी देसाई यांनी इरफान यांना प्रवासाबाबातचे पत्रही दिले होते; पण वापी येथे त्यांचा मार्ग खुंटला. व्यवस्थेमुळे हा सारा प्रकार घडला, अशा प्रतिक्रिया आता उमटत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र
शमसुन्निसा मोमीन यांचे पार्थिव कोल्हापूरला पाठवून द्यावे, यासाठी जोधपूर प्रशासनाला जिल्हाधिकारी देसाई यांनी पत्र दिले आहे. हे पत्र जोधपूर प्रशासनाला पाठविण्यात आले. मोमीन यांचा स्वॅब घेण्यात आला. तपासणीनंतर पुढील निर्णय होईल, अशी शक्‍यता आहे.

६०० किलोमीटरवरून परत
वापी येथे इरफान त्या रात्री साडेबारा ते पहाटे चारपर्यंत तेथील पोलिसांना जोधपूरला जाण्यासाठी विनंती करीत होते. पोलिसांनी परवानगी न दिल्याने त्यांना ६०० किलोमीटरवरून रुग्णवाहिकेसह कोल्हापूरला परत यावे लागले. 

व्हिडिओ कॉलद्वारे आईचा चेहरा दाखवा
गुजरातमधील मंत्री हरीश चौधरी यांनी जोधपूर येथे असणाऱ्या दोन व्यक्तींना त्या दवाखान्यात पाठविले आहे. दरम्यान, व्हिडिओ कॉलवरून मला माझ्या आईचा चेहरा दाखवा, अशी विनंती इरफान यांनी त्या दोघांना केली. येथील नगरसेवक तौफिक मुल्लानी यांनी इरफान यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com