पदाधिकारी निवडीसाठी मोर्चेबांधणी ; आठवडभरात खांदेपालट 

सदानंद पाटील 
Sunday, 6 December 2020

महाविकास आघाडीचे 42 सदस्य आहेत. यातील कॉंग्रेसचे प्रवीण माने यांचा मृत्यू झाल्याने संख्याबळ आता 41 झाले आहे

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा वर्षभराचा कार्यकाल पूर्ण होत आला आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाची तयारी सुरू झाली आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या कारणास्तव मुदतवाढीची मागणी केली होती; मात्र ती सर्वच नेत्यांनी फेटाळली आहे. भाजपने खांदेपालटाचा शब्द दिला होता मात्र तो पाळला नाही, त्याचा परिणाम सत्ता बदल होण्यात झाला. त्यामुळे हा धोका महाविकास आघाडी घेणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच पदाधिकारी बदलावर आठवडाभरात शिक्‍कामोर्तब होणार आहे. 

महाविकास आघाडीचे 42 सदस्य आहेत. यातील कॉंग्रेसचे प्रवीण माने यांचा मृत्यू झाल्याने संख्याबळ आता 41 झाले आहे. भाजप आघाडीकडे 25 सदस्यांचे संख्याबळ असले तरी एका सदस्यास मतदानाचा हक्‍क नसल्याने संख्याबळ 24 आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सध्या भक्‍कम स्थितीत आहे. 

सध्या कॉंग्रेसकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आहे. ओबीसी वर्गासाठी हे पद असून कॉंग्रेसकडे पांडुरंग भांदिगरे व सरिता शशिकांत खोत ही दोन नावे आहेत. शशिकांत खोत यांचे नाव सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठीही चर्चेत आहे. त्यामुळे भांदिगरे यांचा पर्याय आहे. जर हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीसाठी अध्यक्षपदाची मागणी केली तर हे पद राष्ट्रवादीलाही जाऊ शकते. येथून ज्येष्ठ सदस्य युवराज पाटील, जयवंतराव शिंपी यांचे नाव पुढे येण्याची शक्‍यता आहे; मात्र उपाध्यक्ष पद कागल मतदारसंघात राहिल्याने दुसऱ्या तालुक्‍याला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. अशा स्थितीत शाहूवाडी या दुर्गम तालुक्‍यातून निवडून आलेले कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेले विजय बोरगे यांना संधी मिळू शकते. राष्ट्रवादीकडे अध्यक्ष पद गेले तर कॉंग्रेसकडून राहुल पाटील किंवा उमेश आपटे यांना उपाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्‍यता आहे. श्री. आपटे यांनी पदाधिकारी नसताना महाविकास आघाडीचे संकटमोचक म्हणून काम केले आहे. सभापती निवडीत फार अडचणी नाहीत. मागील वर्षीच सभापतिपदासाठी कोणत्या पक्षाला संधी द्यायचे हे निश्‍चित केले आहे. 

पक्ष-आघाडीनिहाय इच्छुक 
राष्ट्रवादी - युवराज पाटील, विजय बोरगे, जयवंतराव शिंपी 
कॉंग्रेस - राहुल पाटील, पांडुरंग भांदिगरे, उमेश आपटे, सुभाष सातपुते. 
शिवसेना ः कोमल मिसाळ, मनीषा कुरणे, रोहिणी आबीटकर, वंदना जाधव, शिवानी भोसले 
चंदगड आघाडी - विद्या विलास पाटील, कल्लाप्पा भोगण व अपक्ष रसिका पाटील 
शेतकरी संघटनेला मुदतवाढ द्यायची की बदल करायचा याचा निर्णय नेते मंडळी घेणार आहेत 

हे पण वाचा तुम्ही सगळे कोल्हापूरचे ब्रॅंड अँबॅसिटर: भूषण गगराणी 

सर्वांना बरोबर घेणारा होणार पदाधिकारी 
नवीन पदाधिकारी निवडताना त्याच्याकडून वादग्रस्त काम होणार नाही, महाविकास आघाडीची बदनामी होणार नाही, सत्ताधारी सदस्यांना न दुखावणारा व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पदाधिकारी निवडण्याकडे महाविकास आघाडीचा कल राहणार आहे. 
 
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur zilla parishad election