जगामध्ये फेमस का आहे कोल्हापूर ? 'हे' अस्सल कोल्हापुरी ब्रॅण्ड आहेत जगात भारी...

Kolhapuri brands are best in the world
Kolhapuri brands are best in the world

करवीरनिवासिनी अंबाबाईचा आशीर्वाद लाभलेली आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची ही कोल्हापूर नगरी. येथील माती, रांगडेपण, दिलदारपणा, निसर्ग सारं- सारं आगळंवेगळं आणि मनाचा ठाव घेणारं. येथील चवदार गूळ, कोल्हापुरी साज, झणझणीत मिसळ, रुचकर तांबडा-पांढरा रस्सा, जल्लोषी फुटबॉल, खासबागमध्ये घुमणारा शड्डू, कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी समृद्ध चित्रकलेचा जोपासलेला वारसा, शिल्पकलेत अद्‌भुत निर्मिती करणारे हे कोल्हापूर. आदरातिथ्याचा वस्तुपाठ म्हणजे कोल्हापूर; आणि संकटकाळी धावून येणारा उमदा कोल्हापूरकर हाच नव्या जगातील एक अस्सल ब्रॅंड आहे.

‘जगामध्ये मशहूर असं आमचं कोल्हापूर,’ असे शाहीर अभिमानाने गातो. त्याला कारणही तसेच आहे. पंचगंगातीरी राहणारे कोल्हापूरकर इरसाल तितकेच दिलदार आहेत. इथल्या लोकांशी दोस्ती केली की, त्याची प्रचीती नक्की येते. कोल्हापुरात काय फेमस विचारायचा अवकाश; एकापेक्षा एक नवे पुढे येतात. कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी गूळ व कोल्हापुरी  तांबडा-पांढरा रस्सा तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचला आहे. कोल्हापुरात आलेला पर्यटक कोल्हापुरी चप्पल खरेदी केल्याशिवाय जसा राहत नाही, तसा तांबडा-पांढरा रस्सा प्यायल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. कोल्हापुरी गुळाचे म्हणाल, तर गुळाची ढेप घेतल्याशिवाय तो परतीची वाट धरत नाही. 

कोल्हापुरी चप्पल...

कोल्हापुरी चप्पल एक प्रमुख आकर्षण आहे. देशभरातील नागरिकांसह परदेशी पर्यटकांच्या पसंतीस त्या हमखास उतरतात. सुबक आकार, नक्षीकाम व टिकाऊपणा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. कोल्हापुरी चपलांची जुनी नावे म्हणजे कोल्हापुरी, कुरूंदवाडी, कापशी. गावांच्या नावांवरून ती दिली असली तरी अथणी, मोरकी अशीही नावे त्याला आहेत. ही चप्पल पूर्णत: कातड्याची असल्याने उन्हाळ्यात तळव्याला थंडावा देण्याचे काम चप्पल करते. या चपला हाताने बनविल्या जातात. त्या बनविण्याचे काम बहुतांशी महिला करतात. कोल्हापूर जिल्ह्यात दहा हजारांवर कुटुंबे कोल्हापुरी चपला बनविण्याच्या व्यवसायात आहेत. स्वित्झर्लंड, अमेरिका, इटली, इजिप्तमध्ये त्याची प्रदर्शने भरवली जातात. कोल्हापूर शहरातील जवाहरनगर, सुभाषनगर हा परिसर कोल्हापुरी चपला बनविणाऱ्या व्यावसायिकांचा आहे. येथे काही कुटुंबे आजही चपला बनवून त्यांची विक्री करतात. शहरातील बाजारपेठेत तर कोल्हापुरी चप्पल विक्रीसाठी हमखास ठेवले जाते. विशेषत: अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भक्तांचा ओघ पाहता येथे विक्रेते कोल्हापुरी चपलांचे मार्केटिंग करायला विसरत नाहीत.  

कोल्हापुरी गूळ....

कोल्हापुरी गूळ देशात प्रसिद्ध आहे. ऑक्‍टोबर महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळघरे सुरू होतात. जिल्ह्यात पूर्वी ९०० च्या आसपास गुऱ्हाळघरे होती. गूळ तयार करण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा व तज्ज्ञ माणूस म्हणजे गुळव्या. त्याच्या कौशल्यावर गुळाची प्रत ठरते. तो जितका हुशार तितका गूळ उत्तम प्रतीचा तयार होतो. त्याच्या मार्गदर्शनाखाली काहिलीत शिजणाऱ्या रसावरील मळी काढली जाते. रसाचा पाक झाल्यावर पाकातील कणी पाहण्याचे काम गुळव्या करतो. मंडपकरी गुळव्याच्या सूचनेनंतर पाक वाफ्यात ओततात. गुळव्या तो पाक सतत हलवतो आणि त्यातून गूळ तयार करतो. सध्या जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांची संख्या १७० वर आली आहे. दरवर्षी ३५ लाख गूळरव्यांची निर्मिती गुऱ्हाळघरांवर होत आहे. त्यांतील ८० टक्‍क्‍यांहून अधिक गूळ गुजरात बाजारपेठेत पाठवला जातो. परदेशातूनही कोल्हापुरी गुळाला मोठी मागणी असून, वर्षाकाठी अडीचशे कोटींची उलाढाल होते. 

कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा...

कोल्हापुरात आल्यावर तांबडा-पांढरा रश्‍श्‍यावर ताव मारल्याखेरीज अनेकांना जेवल्यासारखे वाटत नाही. कोल्हापुरी मटण व तांबडा-पांढरा रस्सा करण्याची कोल्हापुरी पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे. काजू, तीळ, खसखसची पेस्ट, नारळाचे दूध, हिंग, लवंग, दालचिनी, काळेमिरी, हिरवी वेलची, मसाला वेलची, तमालपत्र, लाल मिरची, आले-लसूण पेस्ट हे पदार्थ वापरून झणझणीत पांढरा रस्सा तयार केला जातो. तांबडा रश्‍श्‍यासाठी मटण, आलं-लसूण, कांदा, सुकं खोबरं, कोथिंबीर, भाजलेले तीळ, काजू, खसखस, वेलची, धणे-जिरे, लवंग, दालचिनी, मिरी, हळद, टोमॅटो, तेल, चवीनुसार मीठ वापरले जाते. तांबडा-पांढऱ्यासाठी खवय्यांची संख्या पाहता शहराचा मध्यवर्ती परिसर असो की उपनगरातील; तेथे मांसाहारी हॉटेल, खाणावळ यांची कमतरता जाणवत नाही.

कल्पकतेतून कोल्हापूरचे ब्रॅंडिंग...

प्रतिकूल परिस्थितीत लढण्याची ताकद कोल्हापूरच्या माणसांत आहे. कोल्हापूरच्या मातीत कष्टाळूपणा, रगेलपणा, जिद्द, चिकाटी, धाडस, कल्पकता असे गुण आहेत. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांत कोल्हापूर मागे नाही. क्रीडा क्षेत्रात कोल्हापूरचा दबदबा आहे. कोल्हापूर मोठे ग्रामीण शहर वाटत असले तरी ती वस्तुस्थिती वेगळी आहे. मुंबई, पुण्याच्या तुलनेत कोल्हापूरचा आकार मोठा नाही; मात्र विकासाच्या प्रक्रियेत ते मागेही नाही. प्रत्येक क्षेत्रात कोल्हापूरचा ब्रॅंड आकाराला येतो आहे.  

कोल्हापूर रांगडे आहे. कुस्ती, जलतरण, नेमबाजी, फुटबॉल, क्रिकेटसह विविध खेळांसाठी प्रसिद्ध आहे. उद्योग विश्‍वात चमत्कार घडविणारे कारागीर याच मातीतले आहेत. कोल्हापूरची शंभर वर्षांपूर्वीची छायाचित्रे पाहिली की, तत्कालीन शहराचे अंतरंग उलगडते. छोटे रस्ते, बैलगाड्या, धोतर व फेट्यातील शेतकरी असे चित्र पाहायला मिळते; मात्र ती स्थिती आता राहिलेली नाही. विकासाच्या प्रक्रियेत कोल्हापूर पुढे गेले आहे. नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर शहर झपाट्याने बदलत गेले. इथल्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरचे रुपडे बदलण्याचा सातत्याने प्रयत्न केला. लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवणारी कार्यकर्त्यांची फळीही उदयाला आली. चांगल्या-वाईटाच्या बेरजेचे गणित मांडून हे कार्यकर्ते आंदोलनासाठी तयार राहतात. 

सहकार चळवळीने कोल्हापूरच्या विकासाला वेग दिलाय. साखर, दूध उद्योगांमुळे प्रगती झाली. कागलला पंचतारांकित वसाहत झाली असून, आसपासच्या भागातील लोकांना रोजगाराची सोय उपलब्ध झाली आहे. वसाहतीत मोठमोठे उद्योग आले आहेत. शहरांबरोबरच तालुक्‍यांचाही विकास होत आहे. कागल तालुक्‍यात तीन साखर कारखाने झाले. इतर तालुक्‍यांचाही विकास होतो आहे. दुर्गम भागापर्यंत रस्ते होऊ लागले आहेत. कोल्हापुरात फाउंड्री उद्योग विकसित झाला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात कोल्हापूरचे नाव होऊ लागले आहे. 
मुंबई, पुण्याकडे उच्च शिक्षणासाठी जाण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातून अडीच लाख विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकलचे शिक्षण येथेच उपलब्ध झाले आहे. आयटी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या तरुणाईची येथे कमतरता नक्कीच नाही. भविष्याचा वेध घेण्यासाठी ते सध्या भलेही पुणे, मुंबई, बंगळूरकडे असले तरी भविष्यात त्यांना उद्योग विश्‍वातला स्टार्टअप कोल्हापुरातून करायचा आहे. 

क्रीडा क्षेत्रात कोल्हापूरचा स्वतंत्र ब्रॅंड निर्माण झालाय. असा कोणताच खेळ नाही, की ज्यामध्ये कोल्हापूरचे खेळाडू नाहीत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची गरुडभरारी खूप काही सांगून जाते. कोल्हापूरमध्ये विविध प्रकारचे टॅलेंट आहे.

संपादन - मतीन शेख
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com