पर्यावरण प्रश्‍नी स्वीडनच्या मुलगीला कोल्हापुरकरांची साथ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

पर्यावरणीय प्रश्‍नांनी अस्वस्थ असलेली एक सोळा वर्षांची मुलगी थेट स्वीडनच्या संसदेसमोर जाऊन ठिय्या मांडते. खासदारांना निवेदन देते...

कोल्हापूर : पर्यावरणीय प्रश्‍नांनी अस्वस्थ असलेली एक सोळा वर्षांची मुलगी थेट स्वीडनच्या संसदेसमोर जाऊन ठिय्या मांडते. खासदारांना निवेदन देते. पुढे जाऊन प्रत्येक शुक्रवारी शाळाबंद आंदोलन करते आणि बघता बघता "फ्रायडे फॉर फ्युचर' ही एक जगभरात लोकचळवळ बनून जाते... हीच चळवळ एक वर्षापूर्वी येथे सुरू झाली आणि आता ती लोकचळवळ बनू लागली आहे. 

या उपक्रमात ज्यांना सक्रिय योगदान द्यायचे आहे, त्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन सोशल मीडियावरून सुरू झाले आहे. जगभरात सुरू असलेल्या या चळवळीची प्रेरणा आहे अवघ्या ग्रेटा थनबर्ग. कोल्हापूर जिल्ह्यात ही चळवळ रुजवताना पर्यावरणातील विविध समस्या आणि उपायांवर आधारित ऑडिओ-व्हिज्युअल माहिती शाळा, महाविद्यालये आणि विविध कंपन्यांसह सोसायट्यामध्ये जाऊन दिली गेली. 

प्रत्येक नागरिकाचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्याची लोकचळवळ उभी करणे आणि पर्यावरणपूरक विकास व पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी मूलभूत व्यवस्था बदलाचा आग्रह हे दोन प्रमुख उद्देश ठेवून ही चळवळ काम करत आहे. विशेषतः या चळवळीत शालेय विद्यार्थ्यांना अधिक संख्येने सामावून घेतले जाते. लॉकडाउनमुळे अजूनही शाळा सुरू नसल्या तरी स्वयंसेवकांची फौज सध्या वाढवण्यावर भर दिला जात असून, शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. 

दृष्टिक्षेप
- "फ्रायडे फॉर फ्युचर' जगभरात चळवळ 
- ऑनलाईन नोंदणीचे आवाहन 
- पर्यावरणातील समस्यांवर माहिती पोचवण्याचे काम 
- शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष कृती कार्यक्रम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapurites support Swedish girl