कोल्हापुरचा गणेशोत्सव साधेपणाने ; 'सकाळ'चे आवाहन....

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

शहरातील तालीम संस्था, मंडळांचा कल : गरजूंना देणार मदत, भव्य मिरवणुकांना फाटा

कोल्हापूर - जिंदादिली कोल्हापूरकरांचा गणेशोत्सव म्हणजे वर्षभर सळसळती ऊर्जा देणारा आनंद सोहळा. नोकरी, व्यवसायाच्या निमित्तानं अगदी परदेशात जरी असला तरी प्रत्येक कोल्हापूरकर गणेशोत्सवासाठी हजेरी लावतोच; पण यंदाचा कोरोनाचा विळखाच इतका घट्ट आहे की, कोल्हापूरकरांनाही त्याचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी येथील तालीम संस्था, तरुण मंडळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यावर भर देणार आहेत. दरम्यान, काही तालीम संस्था, मंडळेही स्वतः पुढाकार घेऊन आपापल्या परिसरात लवकरच बैठका घेणार आहेत.

 

मदतीचे हात आता उत्सव साधेपणाने

 

गेल्या वर्षी महापुराचा विळखा पडला आणि त्या पार्श्‍वभूमीवर साऱ्या कोल्हापूरने साधेपणाने गणेशोत्सवाचा आदर्श देत पर्यावरणपूरक विसर्जनाचीही एक वेगळी परंपरा निर्माण केली. यंदाही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केवळ परंपरा म्हणून काही मंडळे छोट्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत, तर काही मंडळांनी जमा होणाऱ्या वर्गणीतून गरजूंना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. भव्य मिरवणुकांना बहुतांश मंडळे फाटा देणार असून, देखाव्यांच्या माध्यमातून प्रबोधनाचा निर्णयही काही मंडळांनी घेतला आहे. काही मंडळांनी तर आताच गणेशोत्सवाची वर्गणी काढून त्यातून गरजूंना मदत सुरू केली आहे. हेच मदतीचे हात आता उत्सव साधेपणाने साजरा करून गरजूंसाठी अधिक व्यापक होणार आहेत.

मंडळाचे मत...

जगावर संकट असताना गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात करणे चुकीचे ठरणार आहे. गतवर्षी महापुरामुळे उत्सव छोट्या पद्धतीने केला आहे. आताही कोरोना महामारीत साधेपणानेच गणेशोत्सव करावा लागणार आहे. लवकरच याबाबत कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल.
- गजानन यादव, अध्यक्ष, लेटेस्ट तरुण मंडळ

कोरोनाच्या संक्रमणामुळे यंदा खंडोबा तालीम मंडळाचा गणेशोत्सव साधेपणाने केला जाणार आहे. गेली काही वर्षे टाळ्या वाजवत गणेश मूर्तीचे विसर्जन केले आहे. याही वर्षे गणेशोत्सव साधेपणानेच साजरा केला जाणार आहे. मूर्तीही लहान ठेवण्याबाबत विचार असून याबाबत सर्व कार्यकर्ते नागरिकांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत.
- प्रल्हाद पोवार, अध्यक्ष, खंडोबा तालीम मंडळ

"व्हीनस कॉर्नर' मित्र मंडळ लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यंदाचा शिवजयंती उत्सवही साध्या पद्धतीने साजरा केला.
जमा झालेल्या वर्गणीतून परिसरातील कुटुंबांना अत्यावश्‍यक साहित्याची मदत केली. गणेशोत्सवासाठी मंडळातर्फे वर्गणी मागितली जाणार नाही आणि देखावाही नसेल. मात्र, रोजचे धार्मिक विधी परंपरेप्रमाणे होतील.
- शशिकांत बिडकर, अध्यक्ष, व्हीनस कॉर्नर मित्र मंडळ

शनिवार आणि बुधवार पेठेशी संलग्न एस. पी. बॉईज व चिंतामणी गणेश भक्त मंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने केला जाणार आहे. मंडळातर्फे नुकतेच चारशे कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. मुंबईहून भव्य गणेशमूर्ती आणून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्याची या मंडळाची परंपरा आहे.
- अनिकेत पाटील, अध्यक्ष, एस. पी. बॉईज

कोरोना विषाणूमुळे यंदाचा गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गरजूंना मदत करणे, प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी राजारामपुरी परिसरातील मंडळे नक्कीच पुढे येतील. केवळ लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करून उत्सवाची परंपरा जपली जाईल. मात्र, सर्व अनावश्‍यक खर्च टाळून जी रक्कम शिल्लक राहिली त्यातून लोकोपयोगी उपक्रमावर भर दिला जाईल.
- ऍड. बाबा इंदुलकर, अध्यक्ष, राजारामपुरी युवक मित्र मंडळ

गेल्या वर्षी महापुरामुळे तटाकडील तालमीने वर्गणी मागितली नाही. यंदा कोरोनामुळे तर आम्ही पावती पुस्तकच छापणार नाही आणि परिसरातील तालीम व मंडळांनाही तसे आवाहन करणार आहे. त्यासाठी लवकरच परिसरातील मंडळांची बैठक घेणार आहे. मंडळांनी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. सर्व धार्मिक विधी करावेत. मात्र, मिरवणूक आणि इतर भव्यतेवरील खर्च टाळावा. दुकानदार, व्यापाऱ्यांकडून वर्गणी मागू नये, अशी विनंती या बैठकीतून करणार आहे.
- महेश जाधव, अध्यक्ष, तटाकडील तालीम मंडळ

गणेशमूर्ती सुद्धा छोटी आणली जाणार आहे. लालबागचा राजा ही पीटीएमटी परंपरा आहे. मात्र, यावर्षी मूर्तीचा आकार लहान करून ती मंडपातच बसेल, याची दक्षता घेतली जाईल. स्वतंत्र डेकोरेशन होणार नाही. मिरवणूक ही होणार नाही. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळेच हा निर्णय घेण्यात येईल.
- राजेंद्र ठोंबरे, उपाध्यक्ष, पाटाकडील तालीम मंडळ

कोरोना विषाणूमुळे जगभर महामारी सुरू आहे. अशा काळात गणेशोत्सव नेहमीप्रमाणे साजरा करणे चुकीचे ठरणार आहे. संयुक्त बुधवार पेठेच्यावतीने साधेपणानेच उत्सव होईल. मिरवणूक निघणार नाही. मोठे देखावे, सजावट होणार नाही. काही ठिकाणी कोरोना प्रतिबंध करण्यासाठी देखावे होतील. मात्र, त्यामध्येही सोशल डिस्टन्स पाळला जाईल, याची दक्षता घेतली जाईल.
- दिगंबर फराकटे, संयुक्त जुना बुधवार पेठ

गेल्यावर्षी पूरस्थितीमुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. पूरग्रस्तांना मदत दिली. यावर्षी ही कोरोना महामारीमुळे मित्र प्रेम तरुण मंडळाकडून सजीव देखावा होणार नाही. डेकोरेशन सुद्धा होणार नाही. मूर्तीचाही निर्णय कुंभारांना विचारून घेतला जाणार आहे. वर्गणीसुद्धा मागितली जाणार नाही. सॅनिटायझर आणि मास्क वाटणार आहोत.
- शिवाजीराव जाधव, अध्यक्ष, मित्र प्रेम मंडळ

भागातील ज्येष्ठांची, नागरिकांची बैठक लवकरच घेतली जाणार आहे. दरम्यानच्या काळात कोरोना विषाणूवर लस निर्माण झाल्यास उत्सव नेहमी प्रमाणे साजरा होईल. मात्र, तसे न झाल्यास जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन ज्याप्रमाणे सूचना देईल, त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. त्याचप्रमाणे फिरंगाई तालीम मंडळाचा गणेशोत्सव होईल.
- रवीकिरण इंगवले, अध्यक्ष, फिरंगाई तालीम मंडळ

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी साधेपणाने आणि प्रशासनाच्या सुचनेप्रमाणेच यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याची प्राथमिक चर्चा झाली आहे. यावर्षी फुटबॉल टीम सीनिअर झाली आहे. त्याचा आनंद साजरा करणार होतो. मात्र, कोरोनामुळे यावर्षी डॉल्बीला सुद्धा फाटा देणार आहोत. मूर्ती लहान आणणार आहोत. साधेपणानेच मूर्तीचे विसर्जन केले जाईल.
- अभिजित राऊत, अध्यक्ष, बालगणेश मंडळ  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur's Ganeshotsav simply Appeal of Sakal media