
जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोवीड लसीकरण केंद्रात सोमवारपासून लसीकरणाला प्रारंभ झाला.
जयसिंगपूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोवीड लसीकरण केंद्रात सोमवारपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. लोकप्रतिनिधी आणि डॉक्टरांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करून लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचाही संदेश देण्यात आला.
नगराध्यक्षा डॉ. निता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती स्वाती सासणे, पंचायत समिती सदस्यांसह डॉक्टरांना लस देण्यात आली. जिल्हा प्रशासनाने शिरोळनंतर सोयीच्यादृष्टिने जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिरोळ तालुक्यातील दुसऱ्या कोवीड लसीकरण केंद्राला मान्यता दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडूरंग खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी लसीकरणाच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.
शासनाच्या कोविड प्रतिबंधक लस मोहीमेअंतर्गत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे लस उपलब्ध झाल्या आहेत. आरोग्य केंद्रातर्पे प्रथम शहरातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, नगरपालिका कर्मचारी याशिवाय ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांना लस दिली जाणार आहे.
या वेळी नगरसेवक संभाजी मोरे, राहुल बंडगर, दादासाहेब पाटील-चिंचवाडकर, डॉ. पी. एस. दातार, हाके, नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र झेले, अर्जुन देशमुख यांच्यासह आरोग्य केंद्राचे कर्मचारी, नागरीक उपस्थित होते.
न घाबरता लस घ्या
दरम्यान, सदरची लस पूर्णपणे मोफत असून न घाबरता लस घ्यावी, असे आवाहन या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी केले. नगराध्यक्षा डॉ नीता माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. खटावकर, जयसिंगपूर मेडिकल असोसिएशनचे डॉ. अतिक पटेल, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतुल घोडके, डॉ. अकलंक चौगुले आदींना लस देण्यात आली.
संपादन - सचिन चराटी
kolhapur