Kowad area changed Farming season Kolhapur Marathi News
Kowad area changed Farming season Kolhapur Marathi News

महापुराने हंगामाचा काळ बदलला

कोवाड : यावर्षी महापूराच्या दणक्‍याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. ऊस शेतीला फटका बसला, पण त्यापेक्षाही भात पिकाची शेती उद्‌वस्त झाली. पुराच्या पाण्यात बुडाल्याने 80 टक्के भाताचे पिक जागेवर कुजून गेले. पाऊस ओसरल्यानंतर काहींनी पुन्हा भाताची लागण केली, पण लांबलेल्या पावसाने त्यावरही पाणी फिरले. त्यामुळे यंदा कोवाड परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळी भात पिक घेण्यासाठी भात रोपांची लागण केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शेती पिकांचा हंगामच बदलावा लागला. यामुळे परिसरातील शेती सध्या हिरवीगार दिसू लागली आहे. 

कोवाड परिसरात ऊस आणि भात ही मुख्यत्वे दोन पिके शेतकरी घेतात. ताम्रपर्णी नदीला बारमाही पाणी असल्याने या भागात वर्षानुवर्षे शेतीचे क्षेत्र वाढत आहे. शेतकऱ्यांनी माळरानावरही शेती फुलविली आहे. प्रत्येक वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी धुळवाफ पध्दतीने कुरीच्या सहाय्याने भाताची पेरणी करतात. क्वचित माणगांव परिसरात भात रोपांची लागण केली जाते. भाताच्या काढणीनंतर मसूर, वाटाणे, हरभरे अशी कडधान्याची पिके घेतली जात असल्याने या भागात विशेषत: भाताची धुळवाप पेरणी केली जाते.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नदीला महापूर आला. या महापूरात भात पिकाचे मोठे नुकसान झाले. पिके वाहून गेली. ओढे, नाले तुटून शेतीचे नुकसान झाले. तब्बल आठ ते दहा दिवस शेतातून पाणी राहिल्याने 80 टक्के भाताचे पिक जागेवरचं कुजून गेले. याचा शेतकऱ्यांना फटका बसला. भाताचे उत्पादन घटले, पण जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्‍न गहण झाला. भात विकत घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. शासनाचीही नुकसान भरापाई अद्याप मिळालेली नसल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी उन्हाळी भाताचा प्रयोग केला आहे. गेल्या वीस दिवसापासून रोप लागण केली जात आहे. महिन्याभरापूर्वी शेतकऱ्यांनी भाताचे तरवे टाकले होते.

रोपांची चांगली उगवण झाल्याने आता रोप लागणीची कामे जोरात सुरू झाली आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शेती पिकांचा हंगामच बदलावा लागला. पावसाळ्यात होणारी भाताची लागण आता उन्हाळ्यात होताना दिसते आहे. त्यामुळे शिवारं हिरवीगार दिसू लागली आहेत. मे महिन्यापूर्वी भातांची कापणी व मळणीची कामे होतील, असे शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. 

भात पिकांचे मोठे नुकसान
महापुरामुळे भात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पावसाळी हंगामात घेतले जाणारे भाताचे पिक आता शेतकऱ्यांना उन्हाळ्यात घेण्याची वेळ आली आहे. जिथे पाण्याची सोय आहे. त्याठिकाणी उन्हाळी भाताचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. 
- शिवाजी पाटील, माणगांव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com