कृष्णा नदीवरील कुडची पुल पाण्याखाली ; आंतरराज्य वाहतूक बंद

Kudchi bridge under Krishna river under water
Kudchi bridge under Krishna river under water

कुडची (बेळगाव) - कृष्णा नदीवर असलेल्या कुडची येथील पुलावर आज (ता. ७) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पाणी आले. त्यामुळे जमखंडी-सांगली मार्गावरील आंतरराज्य वाहतूक बंद झाली आहे. परिणामी सुमारे ४० किलो मीटर फेऱयाने वाहनाधारकांना प्रवास करावा लागत आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णेची पाणीपातळी २४ तासात ५ फुटाने वाढली आहे. परिणामी नदीकाठावरील गावांना धोका वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे आदेश दिले आहेत.

गतवर्षी आॅगस्टच्या पहिल्या आठवडय़ात पावसाने थैमान घातल्याने कुडची पुल पाण्याखाली गेला होता. यंदाच्या हंगामात म्हणावा तसा पाऊस रायबाग तालुक्यात झालेला नाही. पण कृष्णा नदीच्या महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने पाणीपातळी झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे आंतरराज्य वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या कु़डची पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे ही वाहतूक बंद झाली आहे. जमखंडीहून सांगलीला हारूगेरी क्राॅस, अथणी, कागवाडमार्गे सुमारे ४० किलो मीटर फेऱयांने तर रायबागहून अंकली, मांजरी, कागवाडमार्गे जावे लागत आहे.

कृष्णा नदीकाठावरील गावांसह शेतीपिकांना धोका वाढला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास परिसरातील ऊस, सोयाबीनसह अन्य पिके पाण्याखाली जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. गतवर्षी बसलेल्या फटक्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. महापुराची स्थिती उदभवल्यास शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कुडची, जलालपूर, दिग्गेवाडी, भिरडी, मायाक्का चिंचली, बुवाची साैंदत्ती, गुंडवाड, शिरगुर, सिद्धापूर, खेमलापूर, नसलापूर गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धोका अोळखून नदीकाठावरील नागरिकांनी या आधीच स्थलांतर केले आहे. उर्वरित नागरिकही जनावरांसह सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होत आहेत.

रेल्वेसेवा बंद असल्याने खूपच त्रास

रायबागसह अन्य तालुक्यातील अनेक लोक रेल्वेने कर्नाटक-महाराष्ट्रात प्रवास करतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेसेवा बंद असल्याने असल्याने खूपच त्रास होत आहे. अशातच बससेवा तोकडी असून आता कुडची पुलावर पाणी आल्याने अत्यावश्यक कामासाठी फेऱयाने प्रवास करण्याची वेळ आली आहे. रेल्वेसेवा कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com