क्वारंटाईन वाढले, मजुर अडकले... 'या' तालुक्यात खरीप हंगामावर संकट 

Labor Shortage In Agriculture In Chandgad Kolhapur Marathi News
Labor Shortage In Agriculture In Chandgad Kolhapur Marathi News

चंदगड : तालुक्‍याच्या सर्वच भागांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. खरिपाच्या ऐन हंगामात गावागावांत संचारबंदी लागू केली जात असल्याने त्याचा शेती कामांसह लहान-मोठ्या उद्योग, व्यवसायांवरही परिणाम जाणवत आहे. ठराविक गावातील वाढती रुग्ण संख्या समूह संसर्गासाठी धोकादायक मानली जात असल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. तीन महिन्यांच्या लॉकडाउननंतर आता कुठे व्यवहार सुरळीत होत असताना कोरोनाच्या संसर्गाने त्यावर पाणी फिरवले आहे. 

तालुक्‍यात शंभरीच्या आत असलेली कोरोना रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यात झपाट्याने वाढून दीडशेपर्यंत पोहोचली आहे. सुरवातीच्या काळात मुंबई, पुणेसारख्या रेड झोनमधून आलेले नागरिक बाधित सापडत होते, परंतु अलीकडच्या काळात स्थानिक संसर्ग वाढला आहे. बामणकीवाडी, भोगोली, ढेकोळीसारख्या दुर्गम वाडी-वस्तीपर्यंत हा संसर्ग पोहचला आहे. त्यात एकाच कुटुंबातील बाधितांची संख्या आणि त्यांचा गावातील नागरिकांशी पाहता समूह संसर्गाचा धोका वाढला आहे.

या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने गावागावांतील व्यवहार बंद ठेवले आहेत. ज्या गावात एखाद्या कुटुंबात बाधित व्यक्ती सापडली आहे, त्याच्या संपर्कातील इतरांना क्वारंटाईन केल्यामुळे शेती कामांसाठी मजूरच उपलब्ध नाहीत, अशी स्थिती आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात हे प्रकर्षाने जाणवत आहे. भूमिहीन, मजुरी करणाऱ्या समाजातील एक जण बाधित सापडल्याने परिसरातील गावांनी त्या समाजातील मजुरांना आपल्या शेतात मजुरीपासून डावलले आहे. त्यामुळे त्या समाजातील मजुरांवर बेरोजगारी ओढवली आहेच, परंतु मजुरांची समस्याही भेडसावत आहे.

कुटुंबातील उपलब्ध व्यक्तींकडून रोप लावणीचे काम उरकण्याची लगबग चालली आहे. शेतकरी कुटुंबांसाठी रोप लावणीचे काम वेळेत उरकणे, ही मोठी बाब असते. त्यावरच त्यांचे कौटुंबिक अर्थकारण अवलंबून असते. शहरातील उद्योग, व्यवसाय कोरोनाच्या वरंवट्याखाली भरडले गेले. ग्रामीण भागातही कोरोनाचा फटका शेती व्यवसायाला बसत आहे. 

काम संथ गतीने
कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे गावातील व्यवहार ठप्प आहेत. त्याचा परिणाम शेती कामावरही झाला आहे. मजूर उपलब्ध नसल्याने रोप लावणीचे काम संथ गतीने सुरू आहे. 
- कृष्णा पाटील, शेतकरी, कुरणी

संपादन - सचिन चराटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com