लई भारी... शॉर्ट फिल्म्सची शूटिंग वाढली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळूनच शूटिंगची शेड्यूल सुरू असून, काही शॉर्टफिल्म्स आता विविध वाहिन्या आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून प्रसारित होऊ लागल्या आहेत. 

कोल्हापूर : लॉकडाउनमध्ये बंद पडलेली सर्व शूटिंग आता सुरू झाली आहेत. मालिकांबरोबरच आता शॉर्टफिल्मची शूटिंगही वाढली असून येत्या महिन्याभरात किमान दहा ते बारा शॉर्टफिल्म्सची कामे पूर्ण होणार असून, त्या सर्वांना अनुभवायला मिळणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळूनच शूटिंगची शेड्यूल सुरू असून, काही शॉर्टफिल्म्स आता विविध वाहिन्या आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून प्रसारित होऊ लागल्या आहेत. 

शहरातील तरुणाईने लॉकडाउनपूर्वी अर्धवट राहिलेल्या शॉर्टफिल्म्स व ऍडफिल्म्सची कामे पूर्ण करण्याबरोबरच नवीन प्रोजेक्‍टही हाती घेतले आहेत. शासनाचे एकूणच नियम पाहता कमीत कमी गर्दी होईल, याची खबरदारी ही मंडळी घेत आहेत. मुकुंद खुपेरकर यांनी नुकतीच "अंतर्मुख' ही शॉर्टफिल्म केली असून, सध्या एका ऍडफिल्मच्या कामात ही मंडळी व्यस्त आहेत. कोल्हापुरात शूटिंगला परवानगी मिळताच सोनतळी परिसरात एका ऍडफिल्मचे राहिलेले शूटिंग पूर्ण झाले असून, लवकरच ती प्रसारित होईल, असे उमेश बगाडे यांनी सांगितले. 

"सचिन-श्रीकांत' जोडी..
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविणे महत्त्वाचे असून, असा संदेश रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील "सचिन-श्रीकांत' या जोडीने दिला असून, अल्पावधीतच ही शॉर्टफिल्म अनेकांना भुरळ घालते आहे. "तुझ्यात जीव रंगला' फेम "लाडू' ऊर्फ राजवीरसिंह याची प्रमुख भूमिका असून, विशाल करडे, किरण नाळे, विभावरी नाळे, विशाल नाळे, अमृता मोहिते यांच्याही भूमिका आहेत. ही फिल्म विविध वाहिन्या आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून आता कोरोनाबाबत प्रबोधन करत आहे. निर्मिती हुपरीतील हॉटेल महाराजाने केली असून सुयोग जाखोटिया यांचे छायाचित्रण आहे. लेखक व दिग्दर्शक अशी "सचिव व श्रीकांत' ही जोडी असून आजवर अनेक शॉर्टफिल्म केल्या आणि त्यांना अनेक बक्षिसेही मिळाली. लवकरच पूर्ण लांबीचा चित्रपट साकारणार असल्याचे या टीमने जाहीर केले. 

 
ग्रामीण भागातही शूटिंग... 
गेल्या महिन्याभरात साकारलेल्या बहुतांश शॉर्टफिल्म्स या कोरोनावरच आधारित असून मनोरंजनाबरोबरच आरोग्यविषयक संदेश त्यातून तरुणाईने हमखास दिला आहे. केवळ शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील तरुणाईनेही आपापल्या परिसरातील विविध लोकेशन्सवर शॉर्टफिल्म्स साकारल्या आहेत. ग्रामीण भागातील नवीन लोकेशन्स यानिमित्ताने पडद्यावर झळकणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lai heavy ... shooting of short films increased