भाविकांविना सजला ललिता पंचमीचा सोहळा ; श्री अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

सकाळी साडेनऊच्या सुमारास तोफेची सलामी झाल्यानंतर मोजक्‍याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री अंबाबाईची पालखी पूर्वदरवाजातून बाहेर पडली

कोल्हापूर - भाविकांविना यंदा टेंबलाई टेकडीवर ललिता पंचमीचा सोहळा सजला. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि त्र्यंबोलीदेवीच्या भेटीनंतर कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी झाला. त्यानंतर काही काळ कोहळ्याचे तुकडे मिळवण्यासाठी थरार अनुभवायला मिळाला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा अंबाबाईची पालखी फुलांनी सजवलेल्या वाहनांतून टेंबलाई टेकडीवर सोहळ्यासाठी आली. शाहू मिल व टाकाळा येथे परंपरेप्रमाणे पालखी थांबली. दरम्यान, श्री अंबाबाईची आज गजारूढ रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्रीपूजक मकरंद मुनीश्‍वर, माधव मुनीश्‍वर यांनी ही पूजा बांधली. 

सकाळी साडेनऊच्या सुमारास तोफेची सलामी झाल्यानंतर मोजक्‍याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री अंबाबाईची पालखी पूर्वदरवाजातून बाहेर पडली. पायी चालत भवानी मंडपाच्या कमानीपर्यंत पालखी आल्यानंतर तेथून पालखी सजवलेल्या वाहनात ठेवण्यात आली. याचवेळी तुळजाभवानीची पालखीही सजवलेल्या वाहनातून बाहेर पडली. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास श्री अंबाबाईची पालखी टेंबलाई टेकडीवर पोचली. श्री अंबाबाई व त्र्यंबोलीदेवीची भेट झाल्यानंतर महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत कुमारिका पूजन झाले आणि कोहळा फोडण्याचा विधी होताच त्याचे तुकडे मिळवण्यासाठी झटापट सुरू झाली. काही काळाच्या या झटापटीनंतर पालख्या पुन्हा पारंपरिक मार्गाने सजवलेल्या वाहनातूनच मंदिराकडे आल्या. दरम्यान, सात वर्षीय निधी श्रीकांत गुरव हिला यंदा कुमारिका पूजनाचा मान मिळाला. ती रा. ना. सामाणी विद्यालयात पहिलीत शिकते. 

हे पण वाचाहृदयद्रावक : वर्षभरापूर्वीच मुलीला अन् आता एकुलत्या एक मुलाला गमावलेल्या आई वडिलांचा आक्रोश 

 

कोहळ्यावर पोलिसांचा ताबा 
पालखी दर्शनासाठी गर्दी होवू नये, म्हणून पोलिसांचा पालखी मार्गावर चोख बंदोबस्त होता. टेंबलाई टेकडीवर कोहळा फोडण्याच्या विधीवेळीही मोठा बंदोबस्त होता. कोहळा फुटताच त्यावर पोलिसांनी ताबा घेतल्याने झटापटीला प्रारंभ झाला. सुमारे दहा मिनिटे ही झटापट सुरू राहिली. 

हे पण वाचा - कोल्हापूराच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा :  सेवा रुग्णालयाला ‘कायाकल्प’ पुरस्कार जाहीर  

शुकशुकाट अन्‌ उत्साहही 

ललिता पंचमीनिमित्त टेंबलाई टेकडीवर प्रत्येक वर्षी यात्रा भरते. यंदा मात्र मंदिर दर्शनासाठी बंद आहे आणि यात्राच रद्द झाल्याने या परिसरात शुकशुकाट राहिला. मात्र, मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत पारंपरिक उत्साहात ललिता पंचमीचा सोहळा सजला. पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणावर रांगोळ्या नव्हत्या. मात्र, शाहूमिल, बागल चौक, टाकाळा या परिसरात रांगोळ्यांबरोबरच फटाक्‍यांच्या आतषबाजीत पालखीचे स्वागत झाले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lalita Panchami ceremony decorated without devotees in kolhapur