भाविकांविना आज त्र्यंबोली टेकडीवर ललिता पंचमीचा सोहळा

संभाजी गंडमाळे
Wednesday, 21 October 2020

कोल्हापूर ः दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारा ललिता पंचमीचा सोहळा यंदा भाविकांविना साजरा होणार आहे. दुपारी बाराच्या सुमारास मोजक्‍याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी होणार आहे. तत्पूर्वी, करवीर निवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानी आणि गुरूमहाराज वाड्यातील पालख्या सजवलेल्या वाहनातून टेंबलाई टेकडीकडे जाणार आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. 

कोल्हापूर ः दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारा ललिता पंचमीचा सोहळा यंदा भाविकांविना साजरा होणार आहे. दुपारी बाराच्या सुमारास मोजक्‍याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी होणार आहे. तत्पूर्वी, करवीर निवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानी आणि गुरूमहाराज वाड्यातील पालख्या सजवलेल्या वाहनातून टेंबलाई टेकडीकडे जाणार आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. 
ललिता पंचमी म्हणजे कोहळा पंचमी. ललिता पंचमीच्याच दिवशी श्री अंबाबाईने कोल्हासुराचा वध केला. त्यामुळे त्र्यंबोली देवीच्या प्रतीक रूप कुमारीच्या पूजनानंतर तिच्या साक्षीने कोहळा फोडला (कुष्मांड बळी) जातो. परंपरेनुसार कुमारीपूजनाचा मान गुरव घराण्याकडे आहे. श्रीमंत छत्रपतींच्या हस्ते कुमारीपूजन झाल्यानंतर कुमारिकेच्या हस्ते त्रिशूलाने कुष्मांड बळीचा पारंपरिक सोहळा होतो. यंदा कुमारिका पूजनाचा मान निधी श्रीकांत गुरव हिला मिळाला आहे. 
सकाळी साडेनऊला तोफेची सलामी दिल्यानंतर श्री अंबाबाईची पालखी पूर्व दरवाजातून भवानी मंडपाच्या कमानीपर्यंत पायघड्यांवरून चालत येईल. तेथून सजवलेल्या वाहनातून बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, उमा टॉकीज, पार्वती टॉकीजमार्गे शाहू मिल येथे पूजनासाठी थांबेल. तेथील पूजनानंतर बागल चौकातून कमला कॉलेजमार्गे टाकाळा येथे पूजनासाठी थांबेल आणि तेथून टेंबलाई टेकडीकडे पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी जाईल. मोजक्‍याच लोकांची यावेळी उपस्थिती असेल, अशी माहिती मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव यांनी दिली. 

अंबाबाई पुजेचे महात्म्य... 
नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ओम्‌काररूपिणी रूपात पूजा बांधण्यात आली. मार्कंडेय ऋषी आणि नारद मुनी यांच्या संवादातून सनतकुमारांनी सांगितलेल्या श्री अंबाबाईच्या सहस्रनामाचे विवेचन केले आहे. सनतकुमार योगिजनांना श्री अंबाबाईची हजार नावे सांगतात आणि तिची स्तुती करतात, असे या पूजेचे महात्म्य असल्याचे श्रीपूजक मकरंद मुनीश्‍वर, माधव मुनीश्‍वर यांनी सांगितले. 
 

भाविकांना आवाहन 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर यंदा भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. उत्सवातील सर्व धार्मिक विधी परंपरेप्रमाणे सुरू आहेत. मात्र, काही जण जाणिवपूर्वक गैरसमज निर्माण करणारे व्हिडिओ व पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल करून अफवा पसरवत आहेत. अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहे. 

व्हायरल व्हिडीओची चर्चा 
अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी घाटी दरवाजातून मंदिरात जात असल्याचा व्हिडीओ आज व्हायरल झाला होता. व्हिडिओतील तिन्ही महिला पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ऑडिटर असल्याने त्या मंदिरात जात असल्याची माहिती पुढे आली. मात्र, या व्हिडीओची चर्चा दिवसभर सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lalita Panchami ceremony on Trimboli hill today without devotees