esakal | व्हॉट्‌सऍपद्वारे मुलांना खेळाचे धडे
sakal

बोलून बातमी शोधा

Lessons For Kids Through WhatsApp Kolhapur Marathi news

कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउन झाला. अचानक सुटी जाहीर झाली. परीक्षाही रद्द झाल्या. त्यामुळे लहान मुलांना तर पहिल्यांदाच अशी सुटी मिळाली, ज्यामध्ये घराच्या बाहेर पडायचे नाही, खेळायला जायचे नाही, मित्रांनाही भेटायचे नाही. अशाने लहान मुले घरात तेच तेच खेळ खेळून कंटाळली. शाळा कधी सुरू होणार, मी मित्रांना कधी भेटायचे, असे अनेक प्रश्‍न ती आपल्या आईवडिलांना विचारू लागली.

व्हॉट्‌सऍपद्वारे मुलांना खेळाचे धडे

sakal_logo
By
नंदिनी नरेवाडी

कोल्हापूर : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउन झाला. अचानक सुटी जाहीर झाली. परीक्षाही रद्द झाल्या. त्यामुळे लहान मुलांना तर पहिल्यांदाच अशी सुटी मिळाली, ज्यामध्ये घराच्या बाहेर पडायचे नाही, खेळायला जायचे नाही, मित्रांनाही भेटायचे नाही. अशाने लहान मुले घरात तेच तेच खेळ खेळून कंटाळली. शाळा कधी सुरू होणार, मी मित्रांना कधी भेटायचे, असे अनेक प्रश्‍न ती आपल्या आईवडिलांना विचारू लागली. यावर पर्याय शोधत सांगली मिशन सोसायटी, चाईल्डलाईन, रेल्वे चाईल्डलाईन व सांगली चाईल्डलाईन यांच्या संयुक्‍त विद्यमाने हितगुज शालेय समुपदेशन कार्यक्रम घेण्यास सुरवात केली आहे. 

या उपक्रमांतर्गत शून्य ते सहा वयोगट, सहा ते बारा वयोगट व बारा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांच्या पालकांचे वेगवेगळे व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केले आहेत. त्यामध्ये सकाळ ते सायंकाळपर्यंत विविध खेळ कसे घ्यायचे याबाबत मार्गदर्शन केले जाते. त्याचे वेळापत्रक बनविले जाते. मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवून त्यांना इतर गोष्टीत रमविण्यासाठीची युक्ती पालक, शिक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. होम स्कूलिंगचे धडेही पालकांना याद्वारे दिले जातात. 

गेला सव्वा महिना घरात असणाऱ्या मुलांना घरात वावरण्याची सवय झाली आहे. ती ज्यावेळी पुन्हा शाळेत जायला सुरवात करतील तेव्हा त्यांना शाळेत रुळायला वेळ लागेल. ती होमसिक व्हायला लागतील. त्यामुळे घरातच असे वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरत आहे. 

विद्यार्थ्यांसाठी हे उपक्रम 
- घरामध्ये कलात्मक बैठे खेळ 
- संस्थेतर्फे विविध डिजिटल स्पर्धा 
- स्लोगन स्पर्धा 
- ग्रिटींग्स कार्ड तयार करायला शिकवणे 
- आर्ट थेरपी 
- पालकांसोबत गाणी म्हणणे, त्याचे व्हिडिओ करणे 
- नाटुकली बसवणे 
- स्वयंपाकघरात सॅंडविच, भेळ, केक असे छोटे छोटे पदार्थ तयार करायला शिकवणे 
- कपड्यांच्या घड्या घालणे 
- वर्तमानपत्रातील बोधकथा, सुविचार मोठ्याने वाचणे 

ऊर्जा ढळू न देण्यासाठी उपक्रम
लॉकडाउन काळात मुलांची मानसिक व शारीरिक ऊर्जा ढळू न देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये वयोगटानुसार विविध उपक्रम ठरविले आहेत. त्यानुसार प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी व्हॉट्‌सऍप, फेसबुक व यूट्यूबवरून व्हिडिओ शेअर केले जातात. 
- वीरसेन साळोखे, प्रकल्प समन्वयक, अमृता साळोखे, शालेय समुपदेशक