चला, ओझोनचे संरक्षण करूया ; "निसर्गमित्र' संस्थेतर्फे विविध कृती कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

जगभरात बुधवार (ता. 16) आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिन साजरा केला जाणार आहे. ओझोन वायूचा थर नष्ट करणाऱ्या पदार्थांवर बंदी आणून संरक्षणासाठी तीन दशकांपासून विविध प्रयत्न सुरू आहेत.

कोल्हापूर : जगभरात बुधवार (ता. 16) आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिन साजरा केला जाणार आहे. ओझोन वायूचा थर नष्ट करणाऱ्या पदार्थांवर बंदी आणून संरक्षणासाठी तीन दशकांपासून विविध प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आता ओझोन थरातील छिद्र बंद झाले असले तरी अजूनही विविध वायू प्रदूषणामुळे आणखी 50 वर्षे रासायनिक परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या ओझोन संरक्षण दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. येथील निसर्गमित्र संस्थेतर्फेही विविध कृती कार्यक्रमांवर भर दिला जाणार आहे. 
वातानुकूलन यंत्रणा, शीत पेटी, सुगंधी द्रव्याचा (अत्तराचा) वापर कमीत कमी करणे, फोमच्या गाद्यांऐवजी कापसाच्या गाद्या वापरणे, कीटकनाशकांसाठी वनस्पतिजन्य पारंपरिक फवारणीचा वापर करणे, एरो सेल्स स्प्रेऐवजी फुलांची वेणी, मोगऱ्याचा गजरा वापरणे, फ्रीजमधील पाण्याऐवजी माठातील पाण्याचा वापर करणे आदी गोष्टींबाबत प्रबोधन केले जाणार आहे. 
स्थानिक वातावरणात वाढणारी फळे, भाज्या यांची लागवड करून त्याचा वापर करणे, अस्वच्छतेची समस्या कमी करण्यासाठी विविध पातळींवर कचरा व्यवस्थापन करणे, अतिनील किरणांमुळे विविध आजार व मानवाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे इत्यादींवर मात करण्यासाठी स्थानिक परिसरातील परसबाग फुलवण्यासाठीही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. अडुळसा, गवतीचहा, तुळस, गुळवेल, शेवगा, कढीपत्ता, लिंबू, आवळा, कोकम, गुलाबजाम, बंपर, महाळुंग, आले, हळद आदी वनौषधींची परसबाग आणि स्थानिक झाडे लावून ती जगवून प्रदूषण थांबवण्यासाठी आवश्‍यक कार्यशाळाही घेतल्या जाणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's protect ozone; Various action programs by "Nisargamitra"

टॉपिकस
Topic Tags: