लाखात एखादीच घटना! डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश, गर्भधारणा झालेल्या महिलेला जीवदान!

राजेंद्र हजारे
Sunday, 21 February 2021

अल्ट्रासोनोग्राफी करुनही निदान लागत नव्हते. गर्भाशय व गर्भनलिकेत कोणताही दोष दिसून आला नाही.मात्र

निपाणी (बेळगाव) : निसर्गाचा चमत्कार काही औरच असतो. तो मानव आणि विज्ञानासमोर कोणते आव्हान उभे करू शकतो, हे सांगता येत नाही. त्याचा प्रत्येय नुकताच निपाणी येथे आला. चक्क आंतड्याबाहेर चरबीत गर्भधारणा झालेल्या अक्कोळ (ता. निपाणी) येथील महिलेला मृत्यूच्या दाढेतून सोडवून येथील सदगुरू हॉस्पिटलचे डॉ. उत्तम पाटील यांनी अतिशय दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करून जीवदान दिले. सीमाभागातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना व शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉ. पाटील यांनी शनिवारी (ता. २०) पत्रकार बैठकीत केला.

डॉ. पाटील म्हणाले, 'या २९ वर्षीय महिलेच्या पोटात दुखत होते. डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांनी आपणाकडे पाठविल्यावर तपासणी व अल्ट्रासोनोग्राफी करुनही निदान लागत नव्हते. गर्भाशय व गर्भनलिकेत कोणताही दोष दिसून आला नाही. त्यानंतर निपाणीतील रेडिओलॉजिस्ट डॉ. विनायक माने व कोल्हापूरमधील डॉ. संतोष चौगुले यांचा अभिप्राय घेण्यात आला. त्यातून आंतड्याच्या बाहेर गर्भधारणा होऊन दहा आठवड्याचा जिवंत गर्भ असल्याचे निदान झाले. पोटात रक्तस्त्राव सुरु असल्याने महिलेला धोका होता. याबाबत कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया असल्याने आवश्यक ती पूर्वतयारी केली. अखेर १३ फेब्रुवारी रोजी ही दुर्मिळ शस्त्रक्रिया करून महिलेला जीवदान देण्यात यश आले. 

हेही वाचा- बापरे !  सरकारी कर्मचारी सोबत कुटुंबियही सामील ; तेरा हजार बीपीएल शिधापत्रिका रद्द

आपल्या वैद्यकीय सेवेतील हा आगळा-वेगळा अनुभव ठरला.'
आंतड्याच्या बाहेर गर्भधारणा झाल्याची चर्चा निपाणीसह परिसरातील वैद्यकीय क्षेत्रात आठवड्यापासून सुरू आहे. अत्यंत कमी वयात आपल्या अनुभव आणि अभ्यासाच्या जोरावर दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने डॉ. पाटील यांचे कौतूक व अभिनंदन होत आहे. शस्त्रक्रियेसाठी त्यांना भूलतज्ज्ञ डॉ. संतोष घाणगेर, जनरल सर्जन ज्योतिबा चौगुले, डॉ. प्रतिभा पाटील यांच्यासह हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

लाखात एखादीच घटना!

गर्भाशय वगळता गर्भनलिका अथवा अंडकोषात गर्भधारणा होऊ शकते.  हजारात एखाद-दुसरी अशी गर्भधारणा होते. त्यास वैद्यकीय भाषेत एक्टोपिक प्रेग्नेंसी (Ectopic pregnancy) असे म्हणतात. त्यापेक्षा वेगळी आंतड्याबाहेर चरबीत गर्भधारणा होण्याची अशी घटना लाखावर गर्भवतीमध्ये एखादीच होते. त्यात रक्तस्त्राव अधिक होत असल्याने माता मृत्यूचे प्रमाण २० टक्केपर्यंत असू शकते. या महिलेची शस्त्रक्रिया किचकट होती. अखेर शस्त्रक्रिया यशस्वी होऊन या महिलेला जीवदान देता आले. हा आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग असल्याचे डॉ. उत्तम पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा- सौंदत्ती यल्लम्मा, चिंचली मायाक्का मंदिर पुन्हा बंद

'बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आव्हाने वैद्यकीय क्षेत्रासमोर उभी ठाकत आहेत. त्यामुळे गर्भधारणेनंतर ठराविक कालावधीत सोनोग्राफी व तपासणी गरजेची आहे. त्यातून कोणत्याही दोषाचे अचूक निदान होऊन योग्य उपचार करता येतात. तसेच माता व अर्भकाची योग्य ती काळजी घेऊन प्रसूती सुलभ होते.'
-डॉ. उत्तम पाटील, प्रसुतीतज्ज्ञ, निपाणी

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life saved for a woman get pregnant outside the intestine belgaum health marathi news