मांजामध्ये पाय अडकलेल्या बगळ्यास भादवणमध्ये जीवदान

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

बगळा आपले प्राण वाचवण्यास प्रयत्न करीत होता

उत्तूर -  नायलॉन मांजामध्ये पाय अडकल्यामुळे झाडावर लटकणाऱ्या बगळ्याला भादवण (ता. आजरा) येथील तरुणांनी जीवदान दिले आहे. पक्षाचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. येथील विशाल पाटील याला आपल्या घरामागील शेतवाडीमध्ये झाडावर रात्री पक्षी फडफडत असल्याचे आढळले.

पहाटे त्यांला 30 ते 35 फूट उंचीच्या झाडावर एका फांदीमध्ये एक बगळा लटकलेला दिसला. बगळा आपले प्राण वाचवण्यास प्रयत्न करीत होता. विशालने झाडावर चढून त्या बगळ्याला नायलॉनच्या धाग्यातून मुक्त केले. त्याला झाडावरून खाली घेऊन पाणी पाजले. या पक्ष्याच्या पंखांना व पायांना इजा झाल्या होत्या. 
राजेश रावण, अमोल पाटील, राजू सुतार, विशाल पाटील, ओंकार जाधव या तरुणांनी या पक्षाचे प्राण वाचवले खरे पण मकर संक्रांतीच्या तोंडावर पतंगाला लावण्यात येणाऱ्या मांजाला काच लावल्यास पक्षी-प्राणी आणि प्रसंगी माणसाला इजा होऊ शकते, याबाबत काळजी घ्यायला हवी.

हे पण वाचा बदलीच्या हक्कासाठी अंगणवाडी सेविकांचे धरणे

शाळा-कॉलेजात प्रबोधन हवे 
दरवर्षी मकरसंक्रातीच्या दरम्यान पतंग महोत्सव साजरे केले जातात. पतंगाच्या मांज्यामुळे पक्षांना जीव गमवावे लागतात. वाहनचालकही मांजामुळे जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नायलॉन मांजावर बंदी आणावी, अशीही मागणी काही पर्यावरण प्रेमीतून होत आहे. यासाठी शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांना प्रबोधन झाले पाहिजे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life saving for the heron