कलाकारांची सादरीकरणाची संधी हुकली ; युवावर्गाला प्रतीक्षा नाट्यजल्लोषाची!

आकाश खांडके
Friday, 2 October 2020

लॉकडाउनमुळे ऑनलाईन माध्यमाचाच आधार; सादरीकरणाची संधी हुकली

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे सहा महिन्यांचा काळ उलटून गेला तरी नाट्यगृहांची कुलूपे अजून उघडलेली नाहीत. कामगार-तंत्रज्ञ, जाहिरात संस्था यांच्यासह विविध घटकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. मात्र, त्याचबरोबर युवावर्गाला नाट्यजल्लोष अनुभवण्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, अभ्यासाचाच एक भाग म्हणून विद्यार्थी नाटक साकारतात व प्रेक्षकांसमोर सादर करतात. यावर्षी मात्र ऑनलाइन परीक्षा झाल्यामुळे कलाकारांची सादरीकरणाची संधी हुकली आहे.

प्रत्येक वर्षी सप्टेंबरपासून विविध शालेय, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांबरोबरच राज्य नाट्य स्पर्धेचीही चाहूल लागते. महाराष्ट्र कलोपासक संस्थेतर्फे आयोजित पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला विद्यार्थीवर्गाकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. मात्र, यंदा सर्वत्रच शुकशुकाट आहे. अभिनयाबरोबरच लाईट व सेट भाड्याने देणारे व्यावसायिक, वेशभूषा व मेकअप करणारे आर्टिस्ट, जाहिरात संस्था, पोस्टर रेखाटणारे चित्रकार यांच्या उत्पन्नाला मार्चपासून खीळ बसली आहे. 

हेही वाचा- केंद्राने दोन पावले मागे यावे ; कॉंग्रेस नेत्यांची मागणी

शहराचा विचार केला तर भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र हे नाट्य शिक्षणासाठी नावाजलेली संस्था आहे. येथील प्रशिक्षक हिमांशू स्मार्त म्हणाले, ‘‘दरवर्षी १२-१५ विद्यार्थी नाट्यशिक्षणाचे धडे गिरवतात. मागील वर्षी जुलैमध्ये सुरू झालेला वर्ग मार्चमध्ये थांबवावा लागला. या विद्यार्थ्यांचे राहिलेले शिक्षण ऑनलाइन माध्यमातून पूर्ण करण्यात आले. यावर्षीची परीक्षाही ऑनलाइन माध्यमातून झाली आहे. सध्याची परिस्थिती बघता नवीन वर्ग सुरू करण्याबाबत संभ्रम आहे.’

अकरावीपासून मी विविध नाटकांमध्ये सहभागी आहे. यावर्षी मार्चपासून एकही स्पर्धा झालेली नाही. लॉकडाउनमुळे सादरीकरणाच्या भरपूर संधी हुकल्या आहेत.
- नचिकेत पानसकर, विद्यार्थी कलाकार

लॉकडाउनमुळे स्पर्धा झालेल्या नाहीत. नाटक, भूमिका आणि प्रेक्षकांची दाद हा माहोल अनुभवणे प्रेरणादायी असते.
- ऋतुराज पाटील, विद्यार्थी, ललित कला विभाग, शिवाजी विद्यापीठ

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown only supports online media opportunity but Online exams deprived artists of the opportunity to perform