हिंदकेसरी खंचनाळे बिगर पासपोर्ट पोहचले थेट पाकिस्तानात !

Loving temperament of stong wrestler Hindkesari Shripati Khanchanale kolhapur
Loving temperament of stong wrestler Hindkesari Shripati Khanchanale kolhapur
Updated on

कुस्ती खेळताना मैदानात असणारा करारी मल्ल बाहेर मात्र सर्वांशी अदबीने अन्‌ आपुलकीने वागायचा. आखाड्यात कडक शिस्तीचा वस्ताद आखाड्याबाहेर मल्लांचा प्रेमळ गुरु बनायचा. सरावावेळी अंगाच सालटं निघेपर्यत शिक्षा करणारा वस्ताद थोड्या वेळाने पाठीवरुन मायेने हातही फिरवायचा. कडक शिस्तीने गंभीर झालेले वातावरण चेष्टा, मस्करी करत खुलवण्याचा प्रयत्न करणारे मल्ल आणि वस्ताद म्हणजे पहिले हिंद केसरी श्रीपती खंचनाळे, पहिली हिंद केसरी स्पर्धा जिंकणारे खंचनाळे आण्णा गेले आणि जुना जाणता मल्ल आपल्यातून निघून गेला.

आचार, विचार आणि शरीराला शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न खंचनाळे आण्णांनी केला. कर्नाटकांतून महाराष्ट्रात येऊन कोल्हापूर नगरीला त्यांनी स्वतःला अर्पण केले. इथली तांबडी मातीच माझे जगणं सार्थकी लावणारं मूळ आहे, अस म्हणत ते म्हणतं. घरची चांगली शेतीवाडी, आर्थिक सुबत्ता असलेले आण्णा गावाकडे मौजमजेत रानावनात भटककायचे, मित्राच्या समवेत नदीला पोहणे इतकाच कार्यक्रम ठरलेला. वडील यल्लपा यांची मात्र श्रीपती आण्णांना मोठ्ठा पैलवान करण्याची इच्छा. एकेदिवशी अचानक वडिलांनी त्यांना शाळेतून काढलं आणि थेट तालमीत सरावासाठी पाठवले. थोड्या कालावधीत चांगली चमक दाखवल्या नंतर कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीत ते दाखल झाले. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी कोल्हापूरची माती अंगाला लावली. सुप्रसिध्द मल्ल विष्णू नागराळेच्या निगराणीखाली आण्णा घडत होते. त्याचबरोबर मल्लाप्पा तडाखेचं मार्गदर्शन त्यांना लाभत होते. त्या काळातल्या या तगड्या मल्लांच्या कुस्तीकलेचा प्रभाव आण्णांवर पडला आणि त्यांचा कुस्तीतला यशस्वी प्रवास.

दरवेळी वेगळाच डाव...

कर्नाटकातल्या अकोळच्या मैदानात रंगा पाटील या तगड्या, अनुभवी मल्लाला खंचनाळे आण्णांनी चितपट केले आणि सगळीकडे त्यांच्या नावाचा बोलबाला सुरु झाला.चपळाईने समोरच्या मल्लावर कब्जा मजबुत करण्याची खासियत होती. आक्रमक खेळीने समोरच्या मल्लाला ते बेहाल करत. एकेरी पट काढणे, घुटना ठेवणे, एकलंगी भरणे, समोरून आकडी लावणे असे अनेक डाव त्यांच्या भात्यात होते. समोरच्या मल्लाशी दोन हात केले की काही मिनिटे त्याच्या खेळीचा अंदाज घ्यायचा आणि त्याला अनुसरूनच डाव मारायचा, ही कला आण्णा चांगलीच जमली होती. दरवेळी वेगळाच डाव मारुन प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवण्यात ते माहिर झाले. अनेक स्पर्धेसाठी त्यांना निमंत्रणे येत होती. महाराष्ट्रासहीत उत्तर भारतातल्या मेरेरुद्दीन, खडसिंग, बट्टासिंग, किशनलाल, सची राम सारख्या एकापेक्षा एक सरस मल्लांसमवेत त्यांच्या लढती झाल्या. कोल्हापूरच्या खासबाग मैदानात पाकिस्तानी मल्ल सादिक पंजाबीशी झालेली लढत गाजली. तब्बल साडेतीन तास चाललेल्या लढतीत अखेरीस बरोबरी झाली.

1959 ला 'महाराष्ट्र केसरी' आणि 'हिंदकेसरी' या मानाच्या किताबावर त्यांनी आपले नाव कोरले. भारताचे पहिले हिंदकेसरी ठरल्याने पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी शब्बासकी देत 'महाराष्ट्र का नाम रोशन किया अब देश का नाम रोशन करो' अशा शुभेच्छा ही त्यावेळी दिल्या. कोल्हापूरच्या मातीतून तयार झालेल्या मल्लांने हा बहूमान पटकवल्यामुळे कोल्हापूरवासीयांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

हिंदी व उर्दू भाषेची जाण...

दिल्लीतीतून परतल्या नंतर त्यांनी शाहूपुरी तालमीत मल्लांना मार्गदर्शन सुरु केले. हजरत पटेल, महमंद हनिफ, आप्पालाल शेख, संजय पाटील, दिनकर दह्यारी यांसारखे बरेच महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी मल्ल त्यांनी तयार केले. अमोघ अशा वक्तृत्त्वाने ते सर्वांची मने जिंकुन घेत. उत्तर भारतात राहिल्याने त्यांना हिंदी व उर्दू भाषेची जाण ही होती. आधात्म, साधन सुचिता, मल्ल विद्येची आचारसंहिता यावर त्यांचा अभ्यास होता. आपला - परका न मानता प्रत्येक मल्लाला ते खुराकाबद्दल, कुस्तीच्या विविध तंत्रे बद्दल मार्गदर्शन करत होते. पाठीवर थाप मारत ते सर्वांना प्रोत्साहन देत. श्रीपती आण्णांच्या जाण्याने जाण्याने महाराष्ट्राची तांबडी माती पोरकी झाली.

बिगर पासपोर्टचे पोहचले पाकिस्तानात...

पाकिस्तानातील लाहोर, मुलतान येथे त्यावेळी कुस्तीच्या स्पर्धा भरत. दिल्लीतील एका सहकार्यांना त्यांना पाकिस्तानाला जायची योजना सांगितली. पासपोर्ट तर नाही, तो कसा काढायचा हे ही माहित नसल्याने बिगर पासपोर्टचे ते पाकिस्तानात दाखल झाले. तब्बल तीन महिने तिथे वास्तव करत अनेक मैदानातील लढती जिंकल्या व तेथील लोकांची मने जिंकली. तिथून अरबस्तान, इराक, इराण अशा देशाचा दौरा करत त्यांनी तेथील कुस्तीची परंपरा पाहिली. रशिया, जर्मनी, फ्रान्ससारख्या देशात ही ते गेले आणि तब्बल पाच महिन्यांनी दिल्लीला सुखरुप परतल्यांची आठवण ते सांगायचे.

तब्बल आठ वर्षे उत्तर भारतात डंका...

पुढे कुस्तीच्या सरावासाठी दिल्लीला खलीपा बद्रींच्या आखाड्यात ते दाखल झाले. तब्बल आठ वर्षे त्यांनी तिकडे सराव केला. या काळात उत्तर भारतातील अनेक प्रदेशात त्यांनी कुस्त्या जिंकल्या. द्वारका, बडोदाच्या प्रसिद्ध कुस्ती दंगलीत ते चमकले. उत्तर भारतात ते लाडके मल्ल बनले. अनेक इनाम मिळवले. पहाटे तीनला उठून रोज तीन हजार बैठका, तीन हजार जोर असा त्यांचा व्यायाम अन्‌ खुराकात एक लिटर थंडाई, एक किलो तूप, दोन किलो मटण, फळे असा भरपूर आहार ते घेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com