Video : महात्मा गांधी जयंती विशेष ; पर्यावरणपूरकतेमुळे खादीकडे वाढला कल

मतीन शेख
Friday, 2 October 2020

उत्पादनांवर राज्य शासनाकडून सवलतीची मागणी

कोल्हापूर : सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह ही महात्मा गांधींनी सांगितलेली त्रिसूत्री. माणसाने या तत्त्वांचा अवलंब करावा, असा उपदेश त्यांनी केला. स्वदेशीचा नारा देत खादीचा पुरस्कार त्यांनी केला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील खादी हे एक प्रतीकच; परंतु गेल्या काही वर्षांपासून खादी ग्रामोद्योग अडचणीत आहे. कोरोना महामारीमुळे तर कापड उद्योगाच्या स्पर्धेत टिकण्याचे आव्हान खादीपुढे असले तरी पर्यावरणपूरक पेहराव म्हणून खादीकडे नव्या पिढीचा कल हळूहळू वाढू लागला आहे.   

दरम्यान, खादी विक्री केंद्राकडून विविध उत्पादनांवर १५ टक्के व शासनाकडून २० टक्के अशी सवलत ग्राहकांना मिळत होती; परंतु १९९५ पासून राज्य शासनाकडून मिळणारी सवलत बंद झाली आहे. कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार राज्यात मात्र राज्य शासनाकडून अनुदान स्वरुपात सवलत मिळत आहे. महाराष्ट्र शासनाकडून ही सवलत मिळावी, अशी मागणी खादीप्रेमींकडून होऊ लागली आहे.  खादी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा उद्योग. चरखा, सूत घेत महात्मा गांधींनी खादीचा प्रचार सुरु केला होता. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, गरीब, कष्टकरी वर्ग यातून स्वयंपूर्ण होईल, असा यामागचा उद्देश होता. 

 

हेही वाचा- पाटण्यात नांदते हत्तींचे न्हानगं कुटुंब ; टस्कर आण्णाने अखेर शोधले बारक्‍याला -

महाराष्ट्रातील वर्धा हे खादी ग्रामउद्योगाचे केंद्र. तिथूनच खादीचा प्रसार पुढे होत गेला. गांधींनी खादी वस्त्रांना स्वातंत्र्य, स्वावलंबन व ग्रामीण विकासाशी जोडले होते. खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून आजही खादीमध्ये विविध वस्तू मिळतात. गांधी टोपी, ध्वज, शाल, शर्ट, रुमाल ते टॉवेलही येथे उपलब्ध असतात. त्याशिवाय साबण, गुलकंद, आवळा, दंतमंजनपासून अगदी गांधी व विनोबांचे विविध साहित्यही येथे उपलब्ध आहे. या उत्पादनांचा दर्जा चांगला असल्याने किमतींचा स्तर वाढतो. किंमत अधिक असल्याने ग्राहकांची खरेदी घटली आहे.

हेही वाचा-गाळामुळे हिरण्यकेशीचे पात्र झाले उथळ -

खादीचे फायदे... 
  खादीची उत्पादने पर्यावरणपूरक असतात.
  खादी आरोग्यदायी असून ती लवकर स्वच्छ होते.
  उष्ण वातावरणात खादी शरीरास फायद्याची ठरते.
खादीचे अर्थचक्र  
कोल्हापूर जिल्ह्यातील खादी भांडारातून गेल्या वर्षी ४९ ते ४२ लाखांची उलाढाल झाली होती, परंतु यंदा मात्र कोरोना माहामारीमुळे ही उलाढाल २० ते २२ लाखांची आहे. 

चरखे तसेच सुतकताई कालबाह्य ठरत आहे. खादी व ग्रामोद्योग टिकवायचा असेल तर नागरिकांच्या प्रतिसादासह शासनाची मदत महत्त्वाची ठरणार आहे. 
- सुंदरराव देसाई, अध्यक्ष, खादी ग्रामोद्योग संघ 

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahatma Gandhi Jayanti Special story by matin shaikh