"बांधकाम'समोर मनुष्यबळाचे आव्हान

Manpower Challenge In  'Construction' Sector Kolhapur Marathi News
Manpower Challenge In 'Construction' Sector Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : परप्रांतीय मजुरांच्या ताकदीवर येथे उभारलेल्या बांधकाम क्षेत्राच्या डोलाऱ्याची गती आता अपुऱ्या मनुष्यबळामुळे खुंटण्याची शक्‍यता आहे. लॉकडाउनमुळे शहराच्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेले सुमारे चारशेहून अधिक परप्रांतीय आपल्या गावाकडे गेल्याने स्थानिक बाजारपेठेतील उलाढालीवरही परिणाम होणार आहे. मिळेल त्या स्थानिक कामगारांना घेऊन सुरू झालेली अपार्टमेंटसची कामे किती वेळेत पूर्ण होणार, याची चिंता बांधकाम व्यावसायिकांना लागली आहे.

किंबहुना, फ्लॅट ताब्यात मिळण्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षाही करावी लागण्याची शक्‍यता आहे. 
कोल्हापूर, इचलकरंजीनंतर झपाट्याने वाढणारे शहर म्हणून गडहिंग्लजची ओळख झाली आहे. ग्रामीण भागासह इतर शहराच्या लोकांना रहिवाससाठी हे शहर आकर्षणाचे व सुरक्षित ठरत आहे. यामुळे याठिकाणी बांधकाम क्षेत्राने उत्तुंग भरारी घेतली. मागणी वाढल्याने फ्लॅटस्‌ उभारण्याच्या कामांनी गती घेतली. त्यासाठी अपार्टमेंट बांधकाम व्यावसायिकांचे पायही गडहिंग्लजकडे वळू लागले.

या क्षेत्रात बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश या परप्रांतातील कामगारांची संख्या मोठी आहे. गवंडी, सेंट्रिंग, वॉटर प्रुफिंग, पेंटर, फर्निचर, टाईल्स फिटिंग, सिलिंग आदी कामे करणारे कामगार कुटुंबासह बहुसंख्येने आहेत. स्थानिकपेक्षा दुप्पटीने कामाची क्षमता असल्याने मोठे बांधकाम व्यावसायिक परप्रांतीय कामगारांनाच प्राधान्य देतात. विशेष म्हणजे या कामगारांना स्थानिकला कोणी पाहुणे नसतात, धार्मिक विधी नाहीत, लग्न कार्ये नाहीत, यात्रा-जत्रा साजरी करावी लागत नसल्याने त्यांच्यासमोर केवळ कामाचेच टार्गेट असते. यामुळे व्यावसायिकाला आवश्‍यक त्या वेळेत अपार्टमेंट पूर्ण करून मिळण्यास मदत होत असते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करण्याची त्यांची कुवत असल्याने या कामगारांना बांधकाम क्षेत्रात अधिक अधिक मागणी असते. 

दरम्यान, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा पर्याय निवडला आणि हे क्षेत्र ठप्प झाले. परिणामी हाताला काम नसल्याने परप्रांतीय मजूरही आपापल्या गावाकडे परतले. सुमारे तीनशे ते चारशे कामगारांची परतवणी प्रशासनाकडून झाली. आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच कामगार शिल्लक आहेत. लॉकडाउनमध्ये बांधकाम क्षेत्राला शिथिलता मिळाली आहे. यामुळे स्थानिक कुशल कामगारांना घेऊन अपार्टमेंटसची कामे सुरू झाली असली तरी अपेक्षेइतकी गती अजून नाही. त्यातच आता पावसाळा तोंडावर आल्याने या संथगतीच्या कामात पुन्हा भर पडणार आहे.

स्थानिक कामगारांची वेळेतच काम करण्याची मानसिकता असल्याने अपार्टमेंट उभारणीला उशीर होण्याची शक्‍यता बांधकाम व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. आता खरेतर स्थानिक कामगारांना काम करून दाखवण्याची हीच वेळ आहे. परप्रांतीय कामगारांनी व्यापलेल्या या क्षेत्रात कामातून आपली कला आणि क्षमता सिद्ध करण्याची संधी स्थानिकांना मिळाली असली तरी त्याचा कितपत फायदा करून घेतला जातो, हे काही महिन्यांनी स्पष्ट होईल. 

उलाढालीवर परिणाम 
परप्रांतीय मजूर, ठेकेदारांना केवळ कामाच्या मोबदल्यात दर महिन्याला किमान दोन कोटींहून अधिक रक्कम मिळते. अप्रत्यक्षपणे यातील बहुतांशी रक्कम जीवनावश्‍यक साहित्यासह विविध वस्तू खरेदीच्या निमित्ताने स्थानिक बाजारपेठेत येत असते. परंतु, आता अपुऱ्या मनुष्यबळामुळे बांधकाम क्षेत्रच संथगतीने चालणार असेल तर स्थानिक बाजारपेठेतील अशा उलाढालीवरही परिणाम जाणवणार आहे. त्यातच स्थानिक कामगारांच्या माध्यमातून कामाला गती येणार नसल्याने फारसा काही सकारात्मक बदल उलाढालीत होईल, याचीही शाश्‍वती नसल्याचे बांधकाम क्षेत्रातील जाणकारांतून सांगण्यात येते. 

दृष्टिक्षेपात 
- शहरात साधारण 25 अपार्टमेंटस्‌ची कामे सुरू 
- 350-400 परप्रांतीय मजूर गावाकडे रवाना 
- पगारापोटी ठेकेदार, कामगारांना महिन्याला सुमारे 2 कोटींची रक्कम 
- खरेदीच्या निमित्ताने स्थानिक बाजारपेठेत येणारी ही रक्कम थांबली 
- नव्या अपार्टमेंटसच्या कामांना ब्रेक 
 

फ्लॅट देण्यास उशीर होण्याची शक्‍यता
ग्राहकांना सांगितलेल्या वेळेत फ्लॅट देणे बंधनकारक असते. त्यात वेळ लागला, तर ग्राहकांतून चिंता व्यक्त केली जाते. त्याचा परिणाम व्यवसायावर होतो. यामुळे अधिकाधिक कामाची क्षमता असलेल्या परप्रांतीय कामगारांना बांधकाम क्षेत्रात वाव मिळाला. आता ते आपापल्या गावी गेल्याने मनुष्यबळाचा प्रश्‍न उभा आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे. यामुळे अपार्टमेंटसची कामे संथगतीने होणार असल्याने ग्राहकांना फ्लॅट देण्यास उशीर होण्याची शक्‍यता आहे. 
- इंजिनिअर भास्कर पाटील, बांधकाम व्यावसायिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com