हाडांच्या आरोग्यासाठी सोप्या थेरपींचा मंत्र

नंदिनी नरेवाडी-पाटोळे
Thursday, 14 January 2021

डॉ. अमित मूळचे शाहूपुरीतील. मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील बायोटेक्‍नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बी. टेक.ची पदवी संपादन केली.

कोल्हापूर - अन्नाच्या पचनानंतर मानवी शरीरात विविध प्रथिने तयार होतात. ही प्रथिने ठराविक अवयवांसाठी महत्त्वाची असतात. अशाच पद्धतीने तयार होणाऱ्या ‘पीपीएआर’ आणि ‘सीपीई’ या दोन प्रथिनांचा हाडांच्या आरोग्यासाठी कसा फायदा होतो, याचे संशोधन डॉ. अमित चौगुले यांनी अमेरिकेत केले आहे. ‘पीपीएआर’ हे प्रथिन यकृताचे कार्य सुरळीत राहावे, यासाठी मदत करते; तर ‘सीपीई’ हे प्रथिन मेंदूला चालना देते. मात्र, या  दोन्ही प्रथिनांचा उपयोग हाडांच्या आरोग्यासाठीही होऊ शकतो, याबाबतच्या डॉ. अमित यांच्या संशोधनाला अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ टोलिडोने मान्यता दिली आहे. त्यांच्या या संशोधनामुळे हाडांच्या सदृढ आरोग्यासाठी विविध थेरपी सोप्या होणार आहेत.

डॉ. अमित मूळचे शाहूपुरीतील. मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील बायोटेक्‍नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बी. टेक.ची पदवी संपादन केली. त्या दरम्यान ते शिवाजी विद्यापीठात रिसर्चही करीत होते. परदेशात मास्टर्ससाठी प्रवेश घ्यायचा असेल तर जीआरई ही आंतरराष्ट्रीय दर्जाची परीक्षा द्यावी लागते, ही परीक्षाही ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. गुणवत्ता ओळखून युनिव्हर्सिटी ऑफ टोलिडोने त्यांना स्कॉलरशिप प्रदान केली. 
२०१४ ते २०१६ या कालावधीत त्यांनी ‘मास्टर ऑफ सायन्स इन बायोमेडिकल सायन्स’ या विषयातून मास्टर्स पूर्ण केले. हे शिक्षण सुरू असतानाच त्यांनी कोव्हॅन्स या कंपनीत इंटर्नशिप केली. तेथे हाडांच्या आरोग्याबाबत संशोधन करावे, असे सुचले. मास्टर्सनंतर त्यांनी ‘मॉलिक्‍युलर मेडिसीन’ या विषयात संशोधन करण्यास
सुरवात केली. 

२०१६ ते २०२० या चार वर्षांच्या कालावधीत ‘ॲनिमल मॉडेल’वर विविध प्रयोग करीत त्यांनी संशोधनाला आकार दिला. या संशोधनाची माहिती अमेरिकेतील वृत्तपत्रे, सायन्स वर्ल्ड या नियतकालिकात प्रसिद्धही झाली. त्यांना वडील डॉ. सोपान चौगुले व आई डॉ. अल्पना चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

हे आहे त्यांचे संशोधन
 पचनशक्ती आणि हाडांचे आरोग्य यांचा निकटचा संबंध
 या दोन्ही गोष्टी एकमेकांना नियंत्रित करतात
 शरीरातील प्रथिनांचा औषधे म्हणून वापर करता येतो
 हाडांमधील मॅरो फॅट आरोग्यासाठी घातक

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mantra of simple therapies for bone health