आमदार विनय कोरेंच्या वाटचालीत 'हा' आहे हुकमी नंबर

संदीप खांडेकर 
Thursday, 17 September 2020

कोरे यांची ४ ऑक्‍टोबर वाढदिवसाची तारीख. गाडीच्या नंबरची बेरीज चार असावी, असा कार्यकर्त्यांतून आग्रह सुरू झाला. त्यातून २०२० नंबरला ग्रीन सिग्नल मिळाला.

कोल्हापूर : डॉ. विनय विलासराव कोरे शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार. ‘सावकर’ म्हणून ते सर्वपरिचित आहेत. राजकारणाचे अनेक पदर अनुभवलेला हा नेता. वारणेच्या कुशीतलं लाडकं व्यक्तिमत्त्व. त्यासह सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांचा वारसा जोपासणारा ध्येयवेडा माणूस. त्यांनी २००४ ला जनसुराज्यशक्ती पक्षाची स्थापना केली. त्यांच्या या धाडसाने महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. महाराष्ट्राचे अपारंपरिक ऊर्जा व फलोत्पादन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे २०२० नंबरवर त्यांचा विश्‍वास आहे. 

कोरे यांच्याकडे महाविद्यालयीन काळात २१२२ नंबरची मोटरसायकल होती. ती पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. त्यांचा सार्वजनिक जीवनातला वावर १९९२-९३ ला सुरू झाला. गोवा पासिंगची जीप त्यांच्या दिमतीला आली. तिचा नंबर २१७४ होता. त्यांच्या नावावर खरेदी झालेली ही पहिली चारचाकी गाडी. जनसंपर्कात त्यांनी कोणतीच कसूर ठेवली नाही. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट निर्माण झाला. कोरे यांची ४ ऑक्‍टोबर वाढदिवसाची तारीख. गाडीच्या नंबरची बेरीज चार असावी, असा कार्यकर्त्यांतून आग्रह सुरू झाला. त्यातून २०२० नंबरला ग्रीन सिग्नल मिळाला.

हेही वाचा - वेध नवरात्रोत्साचे ;  दुर्गा मूर्ती उंचीचे बंधन नको 

१८२०, १९२० या शंभर वर्षांच्या टप्प्यावर पटकी, प्लेगसाख्या महामारीचे संकट उभे राहिले होते. या संकटांना परतवून लावण्याची हिंमत पूर्वजांत होती. २०२० नंबर घेताना त्याचा ऊहापोह झाला होता. संकटांचं सोनं करण्याचा वारणेचा रिवाज. पुढे जीपचा नंबर महाराष्ट्रात पासिंग करून २०२० करून घेतला आणि ‘वारणा-२०२०’चा वारणेच्या सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. कोरे यांच्या टाटा इस्टेट, टाटा सफारीचे नंबर २०२० राहिले. त्यांच्या लग्नात वारणा समूहाने भेट दिलेल्या मर्सिडीज बेंझ व सध्याच्या प्रॅडोचा नंबर हाच आहे. इतकेच काय तर मोबाईलचे अखेरचे चार अंकही २०२० आहेत. कोरे यांनी जनसुराज्यशक्‍ती पक्षाच्या स्थापनेतून राजकारणात खळबळ उडवली. त्यांच्या पक्षाने २००४ ला चार जागांवर विजय मिळविला. पैकी एक जागा पक्ष पुरस्कृत होती.

महापालिकेच्या राजकारणातही पक्षाने शिरकाव केला. जनसुराज्यशक्ती पक्षाचा नारळ अनेकांनी हाती घेतला. कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाचा चांगलाच बोलबाला झाला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेसह बाजार समितीत जनसुराज्यशक्ती प्रतिनिधीत्व करत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांत त्यांच्या गाडीच्या नंबरची क्रेझ आहे. ‘नाद खुळा गुलाली टिळा’ म्हणणारा त्यांचा कार्यकर्ता आहे. नेत्यावरचे प्रेम व्यक्त करण्याची त्यांची शैलीही वेगळी. ती म्हणजे त्यांच्या गाड्यांवरही २०२० हाच क्रमांक झळकतो.

हेही वाचा - कारवाईचा अधिकार तुम्हाला दिला कोणी 

आमदार कोरे म्हणतात, ‘२०२० मध्ये आपण कोरोनाचा सामना करत आहोत. या वर्षाने आपणाला खूप काही शिकवलं आहे. डॉक्‍टर, आरोग्यसेवक, सेविका, कर्मचारी, आशा सेविका, प्रशासन पोलिसांच्या रूपाने माणसांतील देवाचे दर्शन घडवले. कदाचित भारत २०२० ला महासत्ता बनेल, या माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पाहिलेल्या स्वप्नाच्या पूर्तीचा प्रारंभ ठरेल, असा विश्‍वास वाटतो.’’

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special story of four wheeler car numbers of various people in kolhapur