शासकीय आदेशानंतर महापौर चषक तीन सामन्यांचे ग्रीन सिग्नल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

उर्वरित तीन सामन्यांबाबत निर्णय; ‘केएसए’तर्फे महापालिकेला पत्र
 

कोल्हापूर : शासकीय आदेश प्राप्त झाल्यानंतरच महापौर चषक फुटबॉल स्पर्धेच्या तीन सामन्यांबाबत ग्रीन सिग्नल देण्याचा निर्णय कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनने (केएसए) घेतला आहे. महापालिकेला तसे पत्रही पाठविले. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर मार्चमध्ये महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील तृतीय क्रमांक, उपांत्य व अंतिम सामना स्थगित करण्यात आला. शासकीय आदेशाप्रमाणे सामने स्थगित केल्याचे महापालिका प्रशासनाने ‘केएसए’ला पत्राद्वारे कळविले होते.

आता महापालिका प्रशासनाने कोरोनाची संचारबंदी शिथिल झाल्याने १ ते १० नोव्हेंबर २०२० दरम्यान उर्वरित सामने घेता येतील का, याबाबत ‘केएसए’कडे मार्गदर्शन मागविले होते. त्यावर ‘केएसए’ने शासकीय आदेशानुसार सामने घेण्यात येतील, असे पत्र प्रशासनाला पाठविले आहे. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच सामने होणार, हे निश्‍चित आहे.

हेही वाचा- PHOTO : कोल्हापुरच्या अवलियाने फोटोग्राफीतून उलगडले पक्षांचे विश्व -

उर्वरित सामने आधी की लीगदरम्यान?
दरम्यान सध्या ‘केएसए’ने छत्रपती शाहू स्टेडियमवरील गवत कापणीचे काम हाती घेतले आहे. परतीच्या पावसाने त्यात व्यत्यय येत असून, मैदानावर चिखल होऊ नये, यासाठी ‘केएसए’ प्रयत्नशील आहे. ‘केएसए’ लीग फुटबॉल स्पर्धेने हंगामाचा नारळ फुटत असला तरी यंदा उर्वरित सामने आधी होणार की ‘केएसए’ लीगदरम्यान सामने घेण्यात येणार, याची फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayor Cup after government order