
कोल्हापूर : महापालिकेच्या पहिल्या सभागृहात शिवाजी पेठेतील प्रभागातून निवडून येऊन महापौर झालेले विलासराव सासने हे पेठेतील पहिले महापौर. सभागृहातील सहावे महापौर होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले आणि ‘कास्टिंग व्होट’चा अधिकार बजावण्याची पहिली संधीही त्यांनाच मिळाली होती. एकूणच या साऱ्या ३८ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला.
महापालिकेची पहिली लोकनियुक्त नगरसेवकांची निवडणूक १९७८ मध्ये झाली आणि या निवडणुकीच्या रणांगणात विलासराव सासने शिवाजी पेठेतील नऊ क्रमांकाच्या प्रभागातून उभे राहिले. त्यावेळी ते शिवाजी विद्यापीठात क्लार्क म्हणून रुजू होते. मात्र, निवडणूक लढवताना त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ते निवडणुकीच्या रिंगणात आले व विजयीही झाले. पहिल्या सभागृहात अनेक दिग्गज मंडळी आणि त्यात त्यांचा समावेश; पण सहावे महापौर म्हणून त्यांना २० ऑगस्ट १९८२ ला संधी मिळाली. शिवाजी विद्यापीठाचा माजी कर्मचारी शहराचा महापौर झाला म्हणून विद्यापीठात विशेष सत्काराचे आयोजन झाले. शिवाजी विद्यापीठ सेवक संघाच्या वतीने हा सत्कार झाला. यावेळी विद्यापीठात संगीतशास्त्र विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि त्यासाठी निधीची आवश्यकता होती. मुळात महापालिकेला पंचवीस हजारांहून अधिक निधी नियमाप्रमाणे कुणालाही देता येत नव्हता; पण सासने यांनी एक लाखाची घोषणा केली. त्यावेळी विरोधी पक्षनेते (कै) बळीराम पोवार होते. त्यांना आणि साऱ्या सभागृहाला विश्वासात घेऊन सासने यांनी हा निधी मंजूर करून घेतला आणि विद्यापीठाकडे सुपूर्दही केला. पुढे याच संगीतशास्त्र विभागातून अनेक विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाचे किंबहुना कोल्हापूरचे नाव जगभरात पोचवले.
पहिल्या सभागृहातच उपमहापौर निवडीवेळी शिवाजीराव कदम आणि बंडोपंत नाईकवडे यांची उमेदवारी होती. मात्र, समान मते पडल्याने कास्टिंग व्होटचा अधिकार बजावण्याचा पहिला बहुमान महापौर या नात्याने सासने यांना मिळाला. राज्याचा विचार केला तर केवळ खोपोली महापालिकेचे सिनियर कॉलेज होते. कोल्हापूर महापालिकेचे सिनीयर कॉलेजही त्यांच्याच काळात सुरू झाले. त्यासाठी ज्येष्ठ नेते (कै) श्रीपतराव बोंद्रे यांना घेऊन ते मुंबईला गेले आणि तेथे तत्कालीन मंत्री रामराव आदिक यांच्याकडून कॉलेज मंजुरीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.
शशिकांत दैठणकर त्यावेळी शिक्षण सचिव होते. अंबाबाई मंदिर परिसरात संत गाडगेबाबांचा पुतळा उभारण्याचा विचार पुढे आला. तत्पूर्वी गाडगेबाबांचा विचार समाजातील तळागाळात पोचावा, यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. त्यातही सासने अग्रेसर होते. गो. नी. दांडेकर यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करायचे होते. त्यासाठी ते तीन वेळा त्यांना भेटायला गेले आणि त्यांची तारीख मिळाल्यानंतर उद्घाटन समारंभाची तारीख अंतिम करण्यात आली. मुंबई महापालिकेतर्फे अंधेरी (पूर्व) परिसरातील फर्नांडिस चाळ या भागातील एका मार्गाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय झाला आणि त्या समारंभासाठी महापौर या नात्याने सासने यांना निमंत्रित केले होते. त्यावेळी मनोहर जोशी, दिनकर पाटील प्रमुख उपस्थित होती. रंकाळ्यात बोटिंगचा पहिला प्रयत्नही त्यांच्याच महापौर पदाच्या काळात झाला.
नोकरीचा राजीनामा देऊन शिवाजी पेठेतील नऊ क्रमांकाच्या प्रभागातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजयी झालो. विशिष्ट अशी वेगळी प्रचार यंत्रणा राबवली नाही; पण आपला चांगला जनसंपर्कच कुठल्याही निवडणुकीत महत्त्वाचा असतो, याचा प्रत्यय निवडणुकीच्या निमित्ताने आला. महापौर पदाच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेता आले.
- विलासराव सासने, माजी महापौर
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.