मंत्री, तीन खासदार, दोन आमदार एकत्रित : श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सुद्धा विमानतळावर   

Meeting in Delhi for Kolhapur Airport Night Landing kolhapur marathi news
Meeting in Delhi for Kolhapur Airport Night Landing kolhapur marathi news

कोल्हापूर : कोल्हापुरातील विमानतळावरील नाईट लॅण्डींगसाठी दिल्लीत पुढील आठवड्यात बैठक घेण्याचा निर्णय आजच्या विमानतळ प्राधिकरण सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. स्थानिक पातळीवरील अडथळे दूर करण्यासाठी आणि आवश्‍यक सुविधा देण्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही येथे उपस्थित असलेले श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी स्पष्ट केले असल्याची माहिती पालकमंत्री तथा गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी आज बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.  मुंबई हा सकाळचा स्लाॅटसाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. तीन खासदार आणि पालकमंत्री यांच्या एकत्रित प्रयत्नातून दिल्लीतून अपेक्षीत गती विमानतळाच्या कामासाठी देणार असल्याचेही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी येथे सांगितले. सल्लागार समितीचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशीला माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामाची पाहणी केल्यानंतर कोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनल्स इमारतीचे काम संथ गतीने आहे, ते तातडीने पूर्ण करणे आवश्‍यक असल्याच्या सुचना येथे प्रशासनाला देण्यात आल्या. विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांच्याकडून डिसेंबर अखेर ही इमारत पूर्ण होईल, असे आश्‍वासन देण्यात आले. पाहणी वेळीच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी तातडीने काम होणे अपेक्षीत आहे, त्यासाठी समन्वयक अधिकारी नेमले पाहिजेत, हे खासगी असून चालणार नाही असे सांगितले. तातडीने पालकमंत्री पाटील यांनी तेथेच सुचना देवून अपर जिल्हाधिकारी समन्वयक अधिकारी म्हणून काम करतील असे जाहीर केले. 

कळंबा पॉवर ग्रीड पासून अनेक अडथळे नाईट लॅणंडीगसाठी आहेत. अनेक अडथळे येत असल्यामुळे नाईट लॅण्डींगचे काम थांबल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. सध्या कळंबा बाजूने लॅण्डींग होणारी विमाने हुपरी-मुडशिंगी मार्गे येतील काय याचा ही विचार केला आहे. तसेच त्या ठिकाणाही वीजेचे उपकेंद्र असल्यामुळे ते स्थलांतरीत करण्यासाठी कोटींत खर्च आहे. त्याचाही विचार करावा लागणार आहे. धावपट्टी वाढल्यानंतर नाईट लॅण्डींगचीही आवश्‍यकता वाढते त्यामुळे सध्या आहे त्या धावपट्टीसाठी नाईट लॅण्डींगचा विचार करणार आहोत. यासाठी तीनही खासदार आणि मी एकत्रित डीजीसीएतील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. येथे विमानतळ कामाचाही आढावा घेण्यात आला. 

कोल्हापूर विमानतळासाठी छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्या, अशी मागणी पुढे आली आहे. त्या संदर्भात स्वतः या मुख्य ऑथेरिटीशी चर्चा करणार आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून राजाराम महाराजांच्या हस्ते या विमानतळाचे उद्‌घाटन झाले आहे. हा राजकीय मुद्दा नसून राज्य सरकारने यासाठी ठराव केला आहे. विशेष बाब म्हणून पुर्तता करावी, अशी मागणी करणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नावर सांगितले. 

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार प्रा. संजय मंडलीक, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील यांना आपल्या गाडीत बसवून त्याचे सारर्थ्य केले. विमानतळावर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आल्यानंतर मंत्री,आमदार, खासदारांची धावपळ उडाली. यावेळी कोण कोणाच्या गाडीत बसले हे कळत नव्हते. याचवेळी खासदार संभाजीराजे यांनी थेट स्टेअरींग ताब्यात घेतले आणि कॅन्वॉय बाजूला ठेवूून पालकमंत्री आणि इतर खासदार, आमदार सुद्धा त्यांच्या गाडीत बसून बैठकीच्या ठिकाणी रवाना झाले. हीच एकजूट आता विमानतळाच्या कामाची गती वाढविणार आहे. यापूर्वी विमानतळासंदर्भात बैठक घेण्यावरून ही वाद झाले होते; मात्र आता "हम सब एक है' असे दिसून आले. 

संपादन- अर्चना बनगे

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com