'गावे बंद करून महामार्ग रोकोव्दारे 26 नोव्हेंबरचा संप यशस्वी करणार ; संघटनांचा निर्धार

meeting on Nationwide strike on 26 November in kolhapur
meeting on Nationwide strike on 26 November in kolhapur

कोल्हापूर  - केंद्र व राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या कामगार व शेतकरी धोरणांना विरोध करण्यासाठी येत्या 26 नोव्हेंबरला विविध संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. हा संप यशस्वी करण्यासाठी शहर, तालुके, गाव बंद बरोबर महामार्ग रोको आंदोलन कोल्हापुरात करण्याचा निर्णय आज येथे झालेल्या विविध संघटनांच्या बैठकीत झाला. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणिस बाबूराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतिश कांबळे म्हणाले की, " देशात केंद्र सरकारने राबविलेल्या धोरणामुळे शेतकरी, कामगारांबरोबर सर्वसामान्यांच्या जगण्याचा घास हिरावला आहे. अशी धोरणे संसदेत तयार झाली तरीही त्याला गावागावातून ताकदीनीशी विरोध झाला पाहीजे, त्यासाठी प्रत्येक गाव, तालुका बंदमध्ये सहभागी होईल. तसेच महामार्ग रोको करावा लागेल. त्यासाठी सर्वच संघटना आपली शक्ती पणाला लावतील. जेणे करून कोल्हापुरातील आंदोलनाची दखल दिल्ली दरबारीही घ्यावी लागेल असे आंदोलन व्हावे.'' 

किसन सभेचे नामदेव गावडे म्हणाले की, " शेतकरी, कामगार विरोधी धोरणाबाबत गावागावात असंतोष आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार आदी घटक एकत्र येऊन या आंदोलनाव्दारे आपला असंतोष व्यक्त करतील.'' 

स्वाभिमानीचे नेते प्रा. जालंदर पाटील म्हणाले, देशव्यापी संपाचाच भाग म्हणून 27 तारखेला दिल्लीत आंदोलन होणार आहे, यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी नेतृत्व करतील. त्यांच्या सोबत कोल्हापुरातूनही शेतकरी, कामगार व कार्यकर्ते दिल्लीला जातील. केंद्र सरकारला धोरणांचा फेरविचार करण्यास भाग पडेल असे आंदोलन होईल.'' 

चंद्रकांत यादव यांनी या आंदोलनातील प्रमुख मागण्यांची माहिती दिली. यात कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय 60 करावे, सर्वच घटकांसाठी पेन्शन योजना प्रभावी राबवाव्यात, खासगीकरण बंद करावे, कंत्राटी पध्दती बंद करा, रिक्त पदांच्या भरती करा, अन्न धान्याचा लाभ गरजू घटका पर्यंत पोहचवा, आरोग्य विमा योजनांचा लाभ प्रत्येक दुर्बल घटका पर्यंत पोहचवा आदी मागण्या या आंदोलानाव्दारे करण्यात येणार आहेत. 
यावेळी बाबासाहेब देवकर, रवी भोसले, संभाजी जगदाळे आदी उपस्तित होते. 

या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कोल्हापूरातील संघटना अशा  
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, महाराष्ट्र किसान सभा, मार्क्‍सवादी, लेलीन वादी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, लालनिशान पक्ष, जनता दल, आयटक कामगार संघटना, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी संघटना आरोग्य सेवक, कर्मचारी संघटना शिक्षक शिक्षकेतर संघटना सिटू संघटना प्रवासी वाहतुकदार संघटना अशा 270 संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com